सोळावं वरीस धोक्याचं

केन्द्रीय मंत्रिमंडळाने आपापसातले मतभेद संपवून अखेरीस बलात्काराच्या संबंधातील नव्या आणि कडक कायद्याच्या मसुद्याला परवानगी दिली आहे. आता तो संसदेत येईल आणि संसदेत तो मान्य झाला तर त्याला कायद्याचे स्वरूप येईल. या कायद्यातल्या काही विशिष्ट तरतुदींवरून वाद झाला. संमती वयाची ही तरतूद होती. तिच्यावरून वाद झाल्याने आणि त्याच संबंधातल्या बातम्या छापून आल्याने समाजात आणि माध्यमांत याच मुद्यावरून वाद विवाद झडले. त्यामुळे हा कायदा नेमका कशासाठी केला जात आहे ही गोष्ट लोकांच्या स्मरणात राहिली नाही.

एखाद्या मुलीशी एखाद्या पुरुषाने तिच्या संमतीने संबंध ठेवले तर कायद्याने या संबंधाला शिक्षा होत नाही कारण तिची संमती असते. मात्र अशा संमतीच्या सबंधातल्या मुलीचे वय १८ वर्षाच्या आता असल्यास तिची संमती असूनही हे संबंध अवैध ठरतात कारण तिची संमती अज्ञानातून आलेली असते. ती कमी वयाची, अज्ञान असल्याने तिची संमती असली तरीही तिच्याशी संबंध ठेवणाराला शिक्षा होते. आपल्या देशातला जुना कायदा तसा आहे. पण आता बलात्काराच्या विरोधात नवा कायदा करताना, संबंधित स्थायी समितीने अशी सूचना केली आहे की, यापुढे ही अज्ञानीपणाची वयोमर्यादा  १८ वरून कमी करून १६ करावी.

आता अशा संबंधातली मुलगी १६ वर्षांच्या आत असेल तरच ते संबंध अवैध समजावेत. आधीच्या कायद्यात ती मर्यादा १८ वर्षे होती. कायदा हा नेहमीच बदलत्या काळानुरूप बदलत असतो. आता १६ वर्षाच्या मुलीला सारे काही समजते. नवी पिढी शहाणी झाली आहे. तेव्हा १६ वर्षाची मुलगी याबाबत शहाणी समजावी. अज्ञान समजून नये. बदलत्या काळानुरूप कायदा बदलावा असे कायदाच सांगत असतो. पण तसा तो बदलताना कायद्याच्या तरतुदींत काही विसंगती असता कामा नये. आपल्या देशात संमतीचे वय, मतदानाचे वय, शारीरिक संबंधाचे वय, लग्नाचे वय आणि कायद्याने सज्ञान होण्याचे वय यात अनेक विसंगती आहे.  वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलीचा विवाह करता कामा नये असा आपण पूर्वी कायदा केला आहे. या कायद्याची अंमलबजावणीही फार कडकपणे होत असते. पण आता काल मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकात १६ व्या वर्षी शरीरसंबंधाची मंजुरी दिली आहे. याचा अर्थ असा होतो की  लग्नाच्या आधी दोन वर्षे एखाद्या मुलीला अन्य कोणाशीही  शरीरसंबंध ठेवता येतील. ही वयोमर्यादा कमी करून आपण  विवाहाच्या आधी संबंधांना मान्यता देत आहोत.

या गोष्टीवरून समाजात दोन गट पडले आहेत. आपला समाज विवाहाच्या आधी मुलीलाच काय पण मुलालाही संबंधांची अनुमती देत नाही. पती आणि पत्नी याबाबत परस्परांशी एकनिष्ठ असले पाहिजेत असे आपली परंपरा मानते. पण आता तर लग्नाच्या आधी मुलीला अशी परवानगी मिळत आहे. जुन्या काळच्या लोकांना ही गोष्ट मोठीच अस्वस्थ करणारी आहे. पण त्यांना बदलत्या काळाची हाक ऐकू येत नाही. आपण आपल्या नीतीमूल्यांत काहीही म्हणत असलो तरीही आपल्या समाजात मुले आणि मुली पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात आपापसात मिसळत आहेत. केवळ मिसळतच आहेत असे नाही तर त्यांच्या नीतीमूल्यांच्या कल्पना आपल्या सारख्या राहिलेल्या नाहीत कारण त्यांच्या भोवतालचे वातावरण त्यांच्या वाढत्या वयातल्या नैसर्गिक भावनांना संयमाचे बंधन घालणारे राहिलेले नाही. ते भावनांना खतपाणी घालणारे आहे.

जुन्या काळात स्त्री पुरुष सबंध होते, अनैतिक संबंधही होते. जुन्या पिढीने उगाच पावित्र्याचा आव आणण्यात काही अर्थ नाही. पण त्या संबंधांना संयमाचे बंधन होते आणि ते आतासारखे खुले आम नव्हते. आता ते खुले आम झाले आहेत. त्यामुळे ही वस्तुस्थिती मोकळेपणाने मान्य करून या परिस्थितीशी अनुकूल असे कायदे करायला हवेत हे लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल टाकले आहे. यातली विसंगती आपल्या लक्षात येत आहे. यामागची वस्तुस्थितीही आपल्याला मान्य आहे पण ती खुले आम मान्य करणे आपल्या मनाला पटत नाही ही आपली अडचण आहे.

या संबंधात आपल्या काही अडचणी असल्या तरी आपण, त्या बोलून दाखवत नाही कारण आपल्या समाजात स्त्री-पुरुष संबंधावर उघडपणे आणि मोकळेपणाने चर्चा करण्याची पद्धत नाही. आपल्या समाजातल्या प्रदीर्घ काळच्या परंपरांनी आणि आपल्यावर झालेल्या संस्कारांनी ती पद्धत आपल्यात पडली आहे. आपण आपले संस्कार किती दिवस जपणार आहोत ? जपणे हा शब्द काही लोकांनी चुकीचा वाटेल पण आपण खरोखरच आपले संस्कार कसेबसे जपण्याची धडपड करीत आहोत. अशा संस्कारावर कोणी तरी घाला घालत असतानाच अशी धडपड केली जात असते.  आपल्या मनात नसले तरीही आपले संस्कार पुसट होत आहेत आणि स्वैराचाराकडे झुकलेले पाश्चात्य संस्कार आपल्याला स्वीकारावे लागत आहेत. ते आपण रोखू शकत नाही आपण त्यांच्याकडून अनेक गोष्टी घेतल्या आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, जीवनपद्धती, शिक्षण व्यवस्था, लोकशाही वगैरे घेतल्या आहेत. अशा अवस्थेत स्त्री-पुरूष संबंधाच्या  कल्पनाच आपल्या कशा राहणार आहेत ? त्याही आपण स्वीकारल्या आहेत. त्या अनुरोधाने कायद्यात बदल करणे टाळता येणार नाही.

2 thoughts on “सोळावं वरीस धोक्याचं”

  1. जेव्हा इंद्रोत्सव चालू होता तेव्हा भगवान श्री कृष्णाने सांगितले जसे मनुष्य आपले जुने वस्त्र काढून टाकतो आणि नवे वस्त्र परिधान करतो तसेच काळ हा जुन्या संस्कृती फेकून देत नविन संस्कृती उदयास आणत असतो. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेच आहे, माणसापेक्षा मेंढरं बरी। ते आपल्या भारतीयांसाठीच. आपल्याला फक्त आदर्शवादी राम दिसतो पण कृष्णाचे उपदेश कोणालाच माहीत नाही. रामायण आणि महाभारत यातून सरळ सरळ स्पष्ट केले आहे की स्त्री ही कोणाची व्ययक्तिक आणि खाजगी मालमत्ता नाही. तरीपण लोक तिच संस्कृती जपत आहेत. राम हा आदर्शवादी म्हणून त्याला समाजाने हिरो केला आणि कृष्ण अनेक स्त्रियांशी संबंध असलेला प्रेमी म्हणून त्याला राधेजवळच ठेवला. समाज आजही कृष्णाची निंदा करतो. आणि राधारूपी स्त्री ला हिणवतो. सावित्री ही सुद्धा एके काळी प्रेमिकाचं होती. तिने सत्यवानचे आयुष्य न पाहता त्याच्याशी विवाह केला. धन्य ती प्रेमिका जीने पत्नी बनून पतीचे प्राण वाचविले. परंतु आज तर प्रेमिकेला काहीच महत्त्व राहिले नाही. मूर्ख ब्राह्मणांनी कुठल्याही मुलीला कुणाचीही पत्नी बनवून वटसावित्रीचे नियम पाळायला लावले आहे. अशा प्रकारे प्रेमिकेची जागा पत्नी ने घेऊन समाजाने तिला अपवित्र आणि कालबाह्य केले आहे. प्रेमिकेला धर्मात आणि समाजात कुठले स्थानच नाही. अशाच संस्कृती जर चालत राहिल्या तर पुढच्या भावी पिढ्या हा संस्कृतीचा कोंडमारा सहन करणार नाही. आणि सर्वत्र धर्माविरूद्ध क्रांति आणि संघर्ष पाहायला मिळेल. कधी ना कधी या संस्कृती विकोपास जाणारच.
    धन्यवाद।

  2. भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की जुनी परंपरा आणि चालीरीती नष्ट होऊन नविन संस्कृती उदयास येत असते. आणि हे लोक या काळात सुद्धा तिच नपुंसक संस्कृती वापरत आहेत. अजूनही काही बदलेले नाही. ज्याला तुम्ही पाश्चात्य संस्कृती म्हणता ना तो खरा मानवतावाद आहे. संभोग आपण दिला पण त्यांनी तो समजून त्याला समाजात मानाचे आणि प्रतिष्ठेचे स्थान दिले. शून्य आपण दिला पण त्यावर संशोधन करून गणिताच्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी काढल्या. औषधांचा शोध आपण लावला पण त्यावर संशोधन करून दवाखाने त्यांनी काढली. शस्त्रक्रिया आपण काढली पण आज महत्वाचे ऑपरेशन कोठे होते ? तर भारताबाहेर. अर्थशास्त्र आपण काढला पण आर्थिक दृष्ट्या सशक्त कोण ?
    स्वातंत्र्याचा पहिला बंड इथे पुकारला गेला परंतु पाश्चात्यांनी त्याची क्रांति केली. ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले आहे. हे विश्वची माझे घरं। मग आपण का अजून भारतातच अटकलो आहोत. आपली कल्पनाशक्ती घेऊन ते लोकं हुशार आणि प्रगत झाले आणि आपण मात्र संस्कार आणि संस्कृतीच्या नावाने हलवत बसलो आहोत.

Leave a Comment