राज ठाकरे-खडसेंमध्येच ’सेटलमेंट’

एकमेकांवर ’सेटलमेंट’चा आरोप करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते एकनाथ खडसे एकाएकी गप्प झाले, याचा अर्थ त्यांच्यातच ’सेटलमेंट’ झालेली दिसते, असा टोला प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे. राज ठाकरे यांच्या विश्वासार्हतेबाबत आता जनतेच्या मनात संशय निर्माण झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

सकाळी सरकारविरोधात बोलायचे आणि संध्याकाळी सेटलमेंट करायची, ही विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची पद्धतच आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यावरून खडसे चांगलेच संतापले होते. मी ’सेटलमेंट’ केल्या असत्या तर ’कोहिनूर’ची जागा माझी असती, असा प्रतिहल्ला त्यांनी राजवर चढवला होता. या शाब्दिक चकमकीमुळे भाजप-मनसेचे फटाटण्याची चिन्हे दिसू लागली होती. पण, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला. माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी तर थेट ’कृष्णकुंज’वर जाऊन राजना भेटले आणि नंतर हा ’सेटलमेंट’चा विषयच संपून गेला.

या सगळ्या घडामोडींचा सचिन सावंत यांनी आपल्या पत्रकातून समाचार घेतला आहे. खडसेंवर ’सेटलमेंट’चा आरोप करणार्या राज ठाकरेंवर याआधी अनेकदा ’मांडवली’चा आरोप झाला आहे. तसाच काहीसा प्रकार त्यांनी इथेही केलेला दिसतो. खडसेंवरील आरोपांची ’ब्लू प्रिंट’ देण्याआधीच राज यांनी त्यांच्याशी ’सेटलमेंट’ केलेली दिसते, अशी खोचक टिप्पणी सावंत यांनी केली आहे. आपल्या नेत्याच्या प्रतिमेवरील डाग धुण्याऐवजी भाजपने या प्रकरणावर पडदा का टाकला?, असा सूचक सवालही त्यांनी केला आहे.

Leave a Comment