बिजिंग दि.१४ – जगात सर्वाधिक वेगाने आर्थिक विकास होत असलेल्या कम्युनिस्ट चीनचे नवे अध्यक्ष म्हणून आज शि जिगपिंग यांची निवड संसदेने अधिकृतरित्या जाहीर केली आहे. माजी अध्यक्ष हु जिताओ यांच्या जागी जिगपिंग यांची निवड करण्यात आली असून नॅशनल पिपल्स काँग्रेसने त्यासंबंधीची घोषणा गुरूवारी केली. ग्रेट हॉल ऑफ पिपल, बिजिंग येथे ही घोषणा केली गेली.
शि जिगपिंग यांची यापूर्वीच देशातील महत्त्वाची सत्तास्थाने मानल्या जात असलेल्या पक्ष आणि लष्कर प्रमुखपदावर नोव्हेंबरमध्येच निवड केली गेली होती. तेव्हाच ते चीनचे नवे अध्यक्ष होणार हे निश्चित झाले होते. त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जिगपिंग पहिली परदेशवारी रशिया आणि आफ्रिकेतील टांझानिया या देशांत करणार असल्याचे यापूर्वीच परराष्ट्रमंत्री यांग जैबी यांनी जाहीर केले होते. चीन आणि रशिया यांच्यात स्ट्रेटिजिक पार्टनरशीप आहे आणि ही दोन्ही शेजारी राष्ट्रे आहेत. चीन आणि रशियात व्यापारसंबंधही दृढ आहेत तसेच या दोन देशांचे अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर एकमतही आहे असे सांगण्यात येत आहे. तर टांझानियामध्ये चीन मोठी गुंतवणूक करत आहे त्यामुळे त्या देशालाही अध्यक्ष भेट देणार आहेत असे समजते.