प्रिन्स चार्लस गिरवतोय अरेबिकचे धडे

लंडन दि.१५ – मध्यपूर्वेची संस्कृती आणि कला यांची मोहिनी पडलेला ब्रिटनचा युवराज चार्लस यांनी गेले सहा महिने खासगी शिकवणी लावली आहे. ही शिकवणी अरेबिक भाषा शिकण्यासाठी असल्याचे ब्रिटीश रॉयल सूत्रांकडून समजते.

या संबंधी समजलेली हकीकत अशी की ६४ वर्षीय चार्लस कतार येथे एका रिसेप्शन निमित्ताने गेले असताना पाहुण्यांशी बोलताना त्यांनी अरेबिक भाषा एका कानातून आत शिरते आणि दुसर्यास कानातून बाहेर पडते असे विधान केले होते. त्यावर कतार उर्जा मंत्री मोहम्मद बिन सालेह अलसादा यांनी युवराजांना समजत नाही तर अरेबिक शिका असा सल्ला दिला आणि त्यासाठी वयाचे बंधन पाळू नका असेही सुनावले.

प्रिन्स चार्लसनी हा सल्ला गंभीरपणे घेतला असून गेले सहा महिने ते अरेबिक शिकत आहेत. विविध धर्मांमध्ये सुसंवाद असावा असेही युवराजांचे मत आहे. त्यामुळे इस्लाम समजून घेण्यासाठी अरेबिक आले तर कुराण मूळ स्वरूपात वाचता येईल असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच अन्य इस्लामी पद्धतीच्या मशीदी अथवा संग्रहालये पाहताना तेथील स्क्रीप्टही समजून घेता येणार असल्याने त्यांनी ही शिकवणी सुरू केली आहे. प्रिन्स चार्लसना इंग्रजी बरोबरच फ्रेंच उत्तम येते. तसेच थोडेफार जर्मन आणि वेल्श ते बोलू शकतात असेही सांगण्यात आले आहे.

Leave a Comment