हुंड्यासाठी सुनेचा छळ; ओरिसाच्या गृहमंत्र्याचा राजीनामा

भुवनेश्वर: हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप सुनेने केल्याने ओरिसाचे गृहमंत्री राहुनाथ मोहंती यांनी शुक्रवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याने मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडे राजीनामा सपूर्द केला आहे. दरम्यान, त्यांच्यावर करण्यात आलेले हे सर्व आरोप मोहंती यांनी फेटाळून लावले आहेत.

मुख्यमंत्री पटनायक यांच्याकडे राजीनामा दिल्यानंतर मोहंती म्हणाले, ‘ मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीसांनी स्वतंत्ररित्या करावा. माझ्यावर करण्यात आलेल्य आरोपामध्ये काहीच सत्य नसून केवळ राजकीय सुडबुद्धीने माझ्यावर अशा प्रकारचे आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलिस चोकशीनंतर या प्रकरणातील सत्य सर्वांसमोर येणार असल्याने मी चिंतीत नाही.’

ओरिसाचे माजी गृहमंत्री राहुनाथ मोहंती यांच्याविरुद्ध त्यांची सून वर्षा स्वोनी -चौधरीने गुरुवारी बालासोर येथील जिल्हा मुख्यालयामध्ये लेखी तक्रार अर्ज सादर केला होता. तक्रार अर्जात तिने मंत्री आणि त्यांच्या कुटुंबाकडून मला हुंडा म्हणून २५ लाख रुपये आणि एक वाहन घेऊन ये म्हणून अनेक दिवसांपासून छळ करीत असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय मंत्री मोहंती यांचे चिरंजीव राजाश्री मोहंती जून २०१२ मध्ये लग्न झाल्यापासून मानसिक आणि शारीरिक छळ करीत असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी लग्नावेळी हुंडा म्हणून त्यांच्या मागणीनुसार १० लाख रुपये दिले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या सुनेने केलेल्या तक्रारीमुळे ओरिसाचे माजी गृहमंत्री राहुनाथ मोहंती हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दरम्यान हे सर्व आरोप मोहंती यांनी फेटाळून लावले आहेत.

Leave a Comment