भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातल्या मुरमाडी गावात तिघा सख्ख्या बहिणींचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. सध्या देशात मुलींवर होणार्यात बलात्काराच्या बातम्यांची चर्चा आहे. त्यामुळे या तीन मुलींवरही लैंगिक अत्याचार झाला असावा आणि नंतर त्यांना गावातल्या विहिरीत ढकलून दिले असावे असा अंदाज व्यक्त केला जायला लागला. या घटनेचे पडसाद साऱ्या देशात उमटले. लोकसभेत तर उमटलेच पण आता सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनातही ते उमटले.
या तीन मुली म्हणजे वडील नसलेल्या घरातल्या गरीब आईने सांभाळलेल्या मुली. त्यांचा जो काही संबंध असेल तो मर्यादित लोकांशीच असणार. अनेकांशी आणि अनेक विषयांच्या अनुरोधाने संबंध असल्यास अशा खुनाचा तपास करणे फार अवघड जाते पण या मुलींच्या बाबतीत असे काही होण्याची संभावना नाही. त्यांच्या संपर्काचे विश्वच ते किती मोठे असणार ? तेव्हा त्या छोट्या वर्तुळात त्यांचा मारेकरी शोधून काढणे अजीबात अवघड जाता कामा नये पण त्यांचा खून होऊन महिना लोटला तरीही आरोपीपर्यंत जाण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
खैरलांजी प्रकरणात असेच घडले होते. आरपींना अटक झाली नाही. मग आरडा ओरडा सुरू झाला. तरीही पोलीस खाते आणि गृह खाते शांतच होते. शेवटी या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवण्यात आला. तेव्हा तपास लागला आणि आरोपींना शिक्षा झाल्या. तोवर स्थानिक पोलिसांनी प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न केला होता. आता या मुरमाडी प्रकरणात तिघा बहिणींचा मारेकरी पोलिसांना सापडत नाहीत त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआय कडेच सोपवावा अशी मागणी होत आहे आणि तसे होईपर्यंत तपास लागणार नाही असे वाटायला लागले आहे. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटणार असे दिसायला लागले तेव्हा पोलिसांनी आणि काही संबंधित लोकांनी या प्रकरणात तीन मुलींवर बलात्कार झालेला नाही असे भासवून केस थंड पाडण्याचा प्रयत्न चालविला आहे.
पण असा प्रयत्न त्यांनी करून चालत नाही. त्यासाठी कोणाचा तरी अहवाल हाती असावा लागतो. तसा तो मिळवण्यात आला आहे आणि तो या भगिनींवर बलात्कार झाला नाही असा आहे. या संबंधात पोलिसांचे सारे वर्तन आणि लपवा छपवी प्रकरण दाबण्याच्या दिशेनेच होताना दिसत आहे. एकदाचा हा बलात्कार नाही असे जाहीर झाले की सरकारला हायसे वाटणार आहे आणि विरोधकांचा हल्ला बोथट होणार आहे. तो तसा व्हावा असेच पोलिसांचे प्रयत्न आहेत.
गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडला असतानाही तो तसा नाही असे दाखवून देण्याची कोशीश पोलीस करीत असतात कारण तसे एकदा दाखवून दिले की, राज्यात सारे आलबेल आहे असे चित्र निर्माण करणे त्यांना शक्य होत असते. या तिघींचे मृतदेह हाती आल्याबरोबर रितीनुसार त्यचे शवविच्छेदन करण्यात आले. भंडाऱ्याच्या शासकीय रुग्णालयातल्या पाच डॉक्टरांनी ते केले आणि त्यांनी एकमुखाने या मुलींशी नैसर्गिक आणि अनैसर्गिकही लैंगिक अत्याचार झाले असल्याच्या खुणा दिसत असल्याचा अहवाल दिला. या तिघींचे मृतदेह विहिरीत सापडले होते पण त्या बुडून मरण पावल्या असाव्यात असे काही दिसून आले नाही कारण त्या बुडून मेल्या असत्या तर त्यांच्या पोटात पाणी सापडले असते पण तसे काही दिसून आले नाही.
त्यांना लैंगिक अत्याचार करून मारून टाकले आहे आणि नंतर त्यांना विहिरीत फेकून दिले आहे असे सकृत्दर्शनी दिसते पण या प्रकारातले आरोपी पोलिसांना सापडत नाहीत म्हणून त्यांनी आपली इभ्रत वाचवण्यासाठी या प्रकाराला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा प्रयत्न इतका बनेलपणाचा आहे आणि तो इतक्या बिनडोकपणाने केला जात आहे की त्यामागचा पोलिसांचा हेतू हे प्रकरण दडपण्याचाच आहे हे अगदी स्पष्टपणे दिसत आहे. भंडार्यासच्या डॉक्टरांनी आपला अहवाल दिलेला असतानाही पोलिसांनी मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल मागविला. त्या अहवालात या मुलींवर बलात्कार झाला नसल्याचे म्हटले आहे. हा अहवाल आल्यामुळे पोलिसांना हे प्रकरण बलात्काराचे नाही असे दाखवण्याची सोयच झाली.
पण आता भंडाऱ्याच्या डॉक्टरांनी उचल खाल्ली आहे. मुंबईच्या त्या प्रयोगशाळेचा अहवाल का मागवण्यात आला आणि तो मागवताना त्यांच्याकडे कोणते पुरावे देण्यात आले याची माहिती द्यावी अशी मागणी भंडाऱ्याच्या डॉक्टरांनी पोलिसांकडे केली पण पोलिसांनी या मागणीला उत्तरही दिले नाही आणि मागितलेली माहितीही दिली नाही. मुंबईच्या तज्ञांनी बलात्कार न झाल्याचा निष्कर्ष काढताना तो कोणत्या पुराव्याच्या आधारे दिला आहे आणि भंडाऱ्याच्या डॉक्टरांशी त्यांचा कोणत्या पुराव्याबाबत मतभेद आहे हे समजून घेण्याचा भंडाऱ्याच्या डॉक्टरांना पूर्ण अधिकार आहे कारण या प्रयोग शाळेने त्यांना खोटे पाडले आहे. या दोन संस्थांत माहितीची देवाणघेवाण झाली तरच वस्तुस्थितीवर प्रकाश पडणार आहे पण पोलीस याबाबत काहीही प्रतिसाद देत नाहीत कारण त्यांना वस्तुस्थिती माहीत आहे पण ती त्यांना लोकांच्या समोर यायला नको आहे. मुंबईचे निष्कर्ष त्यांच्या सोयीचे आहेत कारण ते या प्रकरणातल्या खऱ्या आरोपींना पाठीशी घालण्यास उपयुक्त ठरणारे आहेत.