दुष्काळाचा फटका; द्राक्ष उत्पादन घटले

grapesउस्मानाबाद – गेल्या काही दिवसापासून दुष्काळाचा फटका मराठवाड्यातील शेतीला बसला आहे. त्यामुळे सर्वच हाती आलेले पिके गेली आहेत. दुसरीकडे पाण्याअभावी फळाच्या बागा होरपळून निघाला आहेत. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील शेतक-र्यांनी मोसंबी, संत्रा आणि पेरूच्या बागा मोडून काढल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी द्राक्षच्या बागा आहेत. मात्र दुष्काळाचा फटका या द्राक्ष बागाना बसला असून उत्पदनात यावर्षी निम्याने घट झाली आहे. त्यातच तेल्या रोगाचा प्रदुर्भाव झाल्याने द्राक्षच्या बागाच्या बागा नष्ट झाल्या आहेत.

तसे पाहिले तर गेल्या आठ वर्षांत उस्मानाबाद जिल्ह्यात द्राक्षबागांसह उत्पादनाचा चढता आलेख राहिला आहे. या कालावधीत नेदरलँड, लंडन, अमेरिका आदी देशांमध्ये जिल्ह्यातील द्राक्षे निर्यात झाली; परंतु चालू वर्षी द्राक्षबागांना अपुर्‍या पावसाचा फटका बसला. निर्यातीचे प्रमाण अर्ध्यावर आले असून, द्राक्षबागांचे क्षेत्रही ५० टक्क्यांनी घटले आहे.

जिल्ह्यातील हवामान द्राक्षबागांसाठी पोषक आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्ह्यात द्राक्षबागांच्या लागवडीस प्रारंभ झाला. तुळजापूर, उस्मानाबाद, वाशी, भूम व परंडा या पाच तालुक्यांमध्ये प्रामुख्याने द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. २००१ साली अणदूर येथे सुरू झालेल्या खंडोबा पणन सहकारी संघामुळे जिल्ह्यातील द्राक्षे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व मिळणारा चांगला दर यामुळे अनेकांनी उसाचे क्षेत्र मोडित काढून द्राक्षबागांची लागवड केली.

चालू वर्षी द्राक्षबागायतदारांवर पाण्याअभावी मोठे संकट कोसळले आहे. जिल्ह्यात मागील वर्षी दहा हजार एकर क्षेत्रावर द्राक्षबागेची लागवड होती. मात्र, चालू वर्षी यापैकी अर्ध्या द्राक्षबागेवर पाण्याअभावी कु-हाड कोसळली आहे.याचा परिणाम उत्पादनावरही झाला असून, आतापर्यंत केवळ पाच कंटेनर द्राक्षे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल झाली आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारावर दुष्काळामुळे याच बागा मोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथील द्राक्ष बागायतदार शेतकरी सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना मदत करावी अशी मागणी शेतक-यातून केली जात आहे.

Leave a Comment