बँका काळा पैसा गोरा करत असल्याचे उघड

नवी दिल्ली- देशातील काही बँका काळा पैसा गोरा करीत असल्याचे नुकत्याच एका स्टिंग ऑपरेशनमुळे चव्हाट्यावर आले आहे. काळ्या पैशांच्या ‘काळ्या’ व्यवहाराची हादरवून सोडणारी माहिती उजेडात आल्याने सर्वचजन चकित झाले आहेत. विशेष म्हणजे देशातील आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अक्सिस या तीन मोठ्या खासगी बँका सर्व कायदे धाब्यावर बसवून काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा करत असल्याचेही स्टिंग ऑपरेशनमुळे समोर आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश ‘कोब्रा पोस्ट’चे पत्रकार अनिरुद्ध बहल यांनी स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून केला आहे. ‘ऑपरेशन रेड स्पायडर’ नावाने या गोरखधंद्याचे शेकडो तासांचे व्हिडीओ फुटेज कॅमे-यात त्यांनी यशस्वीरीत्या टिपले आहे. देशातील मोठ्या बँका असलेल्या आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अक्सिस तिन्ही बँका कशा पद्धतीने मनी लाँड्रींग करतात, याचे ठोस आणि बिनतोड पुरावे असल्याचे बहल यांनी म्हटले आहे.

‘कोब्रा’च्या टीमने स्टिंग ऑपरेशन करून आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अक्सिसच्या विविध शाखा आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या विमा कंपन्यांमध्येही वेगवेगळ्या मार्गाने माहिती काढली. या बँकांच्या शाखांमध्ये त्यांना बेधडकपणे मनी लाँड्रिंगची शिफारस करण्यात आली. त्याशिवाय बहल हे एका राजकीय नेत्याचे एजंट म्हणून या बॅंकांकडे गेले होते. त्यांनी काही ब्लॅक मनी व्हाइट करण्याची विनंती केली. तेव्हा पॅन किंवा केवायसी (नो युवर कस्टमर) क्रमांकाची मागणी न करता त्यांचे पैसे बँकेत स्वीकारले गेले. त्यामुळेच या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. या सर्व स्टिंग ऑपरेशनमुळे जे सत्य बाहेर आले आहे. त्यामुळे देशभरात खळबळ माजली आहे.

Leave a Comment