नागपूर – राज्यातील अनेक तुरुंगासमोर असलेल्या रिकाम्या जागेचा वापर करून त्यातून मिळणारे उत्पन पोलिस कल्याण निधीत जमा करण्यासाठी राज्य शासनाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. राज्य शासनाने कारागृह परिसरात ‘एटीएम’ लावण्यास नुकतीच परवानगी दिली आहे. त्याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला असून त्यानंतर लगेचच या अध्यादेशाची अंमलबजावणी करीत नागपूर येथिल तुरुंगात ‘एटीएम’ सुविधा सुरु करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसापासून राज्य शासनाने तुरुंगात विविध सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून तुरुंग परिसरात ‘एटीएम’ सुविधा प्रयोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. याला कसा प्रतिसाद लाभतो हे पाहून इतर तुरुंग असलेल्या ठिकाणी ‘एटीएम’ची सुविधा आगामी काळात सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सूत्राने दिली.
या तुरुंगात सुरु करण्यात आलेल्या ‘एटीएम’ सुविधेला कैदी हात सुध्दा लावू शकणार नाहीत. त्यांना भेटायला येणारे नातेवाईक, तुरुंगातील अधिकारी व कर्मचा-यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. कारागृह परिसरात राष्ट्रीयीकृत बँकांनाच एटीएम स्थापण्याची परवानगी देण्यात येईल. याबाबतचा अधिकार पोलिस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षकस्तराच्या अधिका-याना देण्यात आला असल्याचे समजते. या एटीएमपासून मिळणारे भाडे कुटुंब कल्याण निधीमध्ये जमा होणार असून तुरुंगासमोरिल रिकाम्या जागेचा वापर पोलिस कल्याण निधीत जमा करण्याचा हा अभिनव उपक्रम मानला जात आहे. येत्या काळात या सुविधेला कसा रिस्पोन्स मिळतो हे पाहणे ओतुसकयाचे ठरणार आहे.