इस्लामाबाद: काश्मीर प्रश्नाबाबत आज जरा वेगळा सूर काढताना पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री हीना रब्बानी खार यांनी गनिमी कारवायांमुळे काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही असे म्हटले आहे. काश्मीर हा भारताबरोबरचा सर्वात जुना प्रश्न असून तो चौकटी बाहेर जाऊन सोडवण्याची गरज आहे. गनिमी कारवायांमुळे तो सुटण्यास अजिबात मदत होणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
येत्या १६ मार्च रोजी पाकिस्तान सरकारची मुदत संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या खात्याच्या अधिकार्यांशी निरोपाचा संवाद साधताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की; काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी जसा गनिमी कारवायांचा उपयोग होणार नाही तसेच लष्करी बळाचाही उपयोग होणार नाही. नेहमीच्या चौकटी बाहेर जाऊनंच आपल्याला त्यावर तोडगा काढावा लागणार आहे.
आजच्या घडीला तरी भारत काश्मीरबाबत बोलू इच्छित नाही. अशा परिस्थितीत व्यापार, व्यवसाय या मार्गाने दोन्ही देशांमध्ये संपर्काची प्रक्रिया वाढवण्याची गरज रब्बानी यांनी व्यक्त केली. जस जसे भारताशी व्यापारी व व्यावसायिक संबंध वाढत जातील तसे भारतातील जनता त्यांच्या सरकारला काश्मीरचा प्रश्न सोडवण्यास भाग पाडेल; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमेरिकेकडून सहज कधीही मोडून काढला जाईल इतका पकिस्तान कमकुवत राहिलेला नाही; असे विधानही त्यांनी यावेळी केले. अमेरिकन लष्कराने केलेल्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानचे २४ सैनिक ठार झाल्यानंतर पाकिस्तानने अमेरिकेला नाटोचा पाकिस्तानातील तळ बंद करण्याचा आदेश दिला होता. त्यावर अमेरिकेने नमती भूमिका घेत माफी मागीतल्यानंतरच नाटोला पुन्हा तेथे अनुमती देण्यात आली होती याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.