सोशल मिडिया युजर्स जाणार ६ .६० कोटींवर
नवी दिल्ली दि.१३- नागरी भारतात २०१३ च्या जूनपर्यंत सोशल मिडिया साईट वापरणार्यांदची संख्या तब्बल ६ कोटी ६० लाखांवर जाईल असा अंदाज इंटरनेट मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया आणि इंडियन मार्केट रिसर्च ब्युरोने केलेल्या सर्वेक्षणातून वर्तविला गेला आहे.
इतक्या वेगाने युजर्सची संख्या वाढण्यामागे आवाक्यात आलेले स्मार्टफोन आणि मोबाईल इंटरनेटचा वेगाने होत असलेला प्रसार ही मुख्य कारणे असल्याचे सांगितले जात आहे. डिसेंबर २०१२ पर्यंतच नागरी भारतात सोशल मिडीया युजरची संख्या ६ कोटी २० लाखांवर पोहोचली हेाती. या संबंधाने झालेल्या सर्वेक्षणातून ७४ टक्के इंटरेनट युजर सोशल मिडीया साईटस पाहतात असे दिसून आले होते. भारतात ८० दशलक्ष म्हणजे ८ कोटी इंटरनेट युजर आहेत. त्यातील ७२ टक्के म्हणजे ५८ दशलक्ष युजर कोणती ना कोणती सोशल साईट पाहात असतात. त्यासाठी ते वैयक्तीक संगणक, लॅपटॉप अथवा मोबाईचा वापर करतात असेही आढळले आहे.
भारतात सोशल मिडीया साईटमध्ये फेसबुक ही सर्वाधिक पाहिली जाणारी साईट असून सुमारे ९७ टक्के इंटरनेट युजर ही साईट पाहतात. त्या खालोखाल गुगल प्लस व लिंकडेनचा नंबर आहे. प्रत्यक्षात लिंकडेन महिला आणि २५ वर्षांवरील युजर अधिक प्रमाणात पाहतात असेही आढळले आहे. इंटरनेट वापरणारा भारतीय सुटीचे दिवस सोडून दर दिवशी सरासरी २९.६ मिनिटे सोशल मिडिया साईट पाहतात तर सुटीच्या दिवशी हे प्रमाण २८.८ वर असते असेही या पाहणीत दिसून आले आहे.