नवी दिल्ली: मोठ्या आर्थिक आव्हानाच्या स्थितीला तोंड देण्यासाठी सरकारतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. परंतु या आर्थिक उपाययोजनांच्या बाबतीत सरकारला नाऊमेद केले जाऊ नये असे आवहन विरोधकांना करतानाच येत्या दोन-तीन वर्षात आपण पुन्हा वेगाने प्रगतीच्या मार्गावर जाऊ असा विश्वास पंतप्रधशन मनमोहनसिंग यांनी व्यक्त केला.
आज प्रश्नोत्तराच्या तासात एका पुरवणी प्रश्नाच्या अनुषंगाने विरोधी सदस्यांनी देशाच्या ढासळत्या आर्थिक स्थितीबद्दल स्वत: पंतप्रधानांनीच खुलासा करावा अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, सध्या सर्वत्रच मंदीचे वातावरण आहे. त्याचा देशाच्या आर्थिक विकासदरावर विपरीत परिणाम झाला आहे. पण नाउमेद करण्याच्या प्रयत्नाने काही साध्य होणार नाही. आम्ही उपाययोजना करीत आहोत आणि येत्या दोनतीन वर्षात आपण पुन्हा उच्च विकास दर गाठू; असेही ते म्हणाले.
भाजपचे शहानवाझ हुसेन आणि कम्युनिस्ट पक्षाचे गुरूदास दासगुप्ता यांनी मंदीच्या वातावरणाविषयी पंतप्रधानांनी उत्तर द्यावे अशी मागणी लोकसभेत केली होती. या प्रश्नाला नियोजन विभागाचे राज्यमंत्री राजीव शुक्ला हे उत्तर देऊ शकणार नाहीत; कारण ते अर्थतज्ज्ञ नाहीत असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. त्यानंतर स्वत: पंतप्रधानांनी आर्थिक स्थितीबाबतचा खुलासा केला.
देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीला कारणीभूत असलेल्या परिस्थितीबाबत आम्ही आर्थिक सर्व्हेक्षणात आणि अर्थमंत्र्यांच्या अंदाजपत्रकीय भाषणात सविस्तर उत्तर दिले आहे; असे सांगून पंतप्रधान म्हणाले की आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक घटनांचाही भारताच्या स्थितीवर विपरीत परिणाम झाला आहे. सन २००८-०९ साली आंतरराष्ट्रीय पातळीवर बँकींग घोटाळा झाला. नंतर युरोझोनचा बिकट पेचप्रसंग उद्भवला. त्याचा भारताच्या एकूण आर्थिक विकासावर परिणाम झाल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.