भारतीय वाहन उद्योग मंदावला

नवी दिल्ली: वाहन उद्योगात चीनलाही मागे टाकणारे भारतातील वाहन उद्योगसमूह आता उत्पादनात मागे पडताना दिसत आहेत. भारतातील वाहन उद्योगाची प्रगती जगभर प्रसिद्ध असली तरीही गेल्या बारा वर्षांपासून हा उद्योग डबघाईला आला आहे. गेल्या महिन्यात वाहन उत्पादनाच्या विक्रीत तब्बल २६ % घसरण नोंदविली गेली. त्यामुळे वाहन उद्योगसमूहांनी त्यांचे उत्पादन कमी करण्यास सुरुवात केली आहे. पुढील आर्थिक वर्षातही या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचे जाणकारांचे मत आहे.

ऑटो कंपन्यांची संघटना ‘सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल मॅनिफॅक्चरर्स’ अर्थात ‘सियाम’च्या मते फेब्रुवारी २०१३ मध्ये एकूण ५८ हजार ५१३ कार्सची विक्री झाली. ही विक्री गेल्या वर्षापेक्षा २५.७ % नी कमी आहे. यामध्ये स्पोर्टस् युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) वगळता इतर वाहनांच्या उत्पादनात घट झाली आहे. मात्र अर्थसंकल्पात ‘एसयूव्ही’वर उत्पादन शुल्क वाढविल्याने त्याच्याही उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुचाकीमध्ये स्कूटर आणि मोपेडची विक्री वाढलेली दिसते; तर मोटरसायकलच्या विक्रीत ४.४८ % घट झाली आहे. सियामचे उपमहानिदेशक सिगातो सेन यांनी म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेच्या मंदीमुळे वाहनांची विक्री मंदावली आहे. एका बाजूला कारची विक्री घटत चालली आहे; तर दुसर्‍या बाजूला त्यांचे उत्पादन वाढत आहे. परिणामी कंपनीत कार पडून आहेत. त्यामुळे मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, निस्सान, स्कोडा, वोक्सवॅगन या नावाजलेल्या कंपन्यांनीही उत्पादनात घट करण्यास सुरुवात केली आहे.