पुणे: मराठी चित्रपट घराच्या चौकटीबाहेर निघत नाहीत, असेच चित्र काही वर्षांपूर्वी पाहायला मिळत होते. मात्र मराठीतही दर्जेदार चित्रपट तयार होतात आणि भरमसाठ कमाईही करतात हे रवी जाधव आणि रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या ‘बालक-पालक’ या चित्रपटाने दाखवून दिले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० दिवस तर पूर्ण केलेच, पण त्यासोबतच तब्बल ९ कोटी रुपयांची कमाई करून मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला.
‘बालक पालक’ची ९ कोटींची झेप
हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असतानाच रितेशलाही मराठीची भुरळ पडली. यामुळेच त्याने उतुंग ठाकूर, रवी जाधव यांच्याकडे ‘बालक- पालक’ची निर्मिती करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला रवी आणि उतुंग यांनीही मान्यता दिली. जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला. किशोरवयीन मुलाचे लैंगिक भावविश्व अशी या चित्रपटात साकरण्यात आले. चित्रपटाची कथा दर्जेदार तर होती. शिवाय यातील प्रत्येक बालकलाकार आणि इतरांनी चांगले काम केले. त्यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० दिवस पूर्ण केले. आजवरच्या कोणत्याही मराठी चित्रपटाच्या तुलनेत दमदार अशी ९ कोटींची कमाईही केली. येणा-या काही दिवसांत हा आकडा १० कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. बीपीच्या आधी काही मोजक्याच मराठी चित्रपटांनी १ ते ३ कोटी रुपयांचा टप्पा गाठला होता. त्यामुळे साहजिकच कमाईबाबत बीपी मराठीत सर्वात वरच्या स्थानी जाऊन बसला आहे.
हिंदी चित्रपट करत असतानाच रितेश देशमुख आता मराठी चित्रपटातही आपल्या अभिनयाचे पैलू दाखण्यास सज्ज झाला आहे. निशिकांत कामत याचे दिग्दर्शन असलेल्या ‘लई भारी’ या चित्रपटात तो मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार असून लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना पहिल्यांदाच रितेशचा जलवा पाहायला मिळणार आहे.