विरोधकांमध्येच हमरी तुमरी

मुंबई: विरोधकांमधील टाळीचे राजकारण टोल्यावर पोहोचले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी कोहिनूरच्या जमिनीचा मुद्दा काढून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चिमटा काढला आहे.

सेटिंग केली असती तर कोहिनूर मिल माझ्या नावावर असती, असा अप्रत्यक्ष आरोप करत खडसे यांनी राज ठाकरे यांच्या आरोपाला उत्तर दिले आहे. तसेच आपण तोडपाणी करत असल्याचे पुरावे द्या, असे आव्हानही एकनाथ खडसे यांनी दिले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचे साटेलोटे असल्याचा आरोप, राज ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आज खडसेंनी राज यांना आव्हान दिले आहे.

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आखाड्यात दरवेळी विरोधक आणि सत्ताधार्‍यांमध्ये जुंपते. मात्र यावेळी विरोधकांनीच एकमेकांची प्रकरणे चव्हाट्यावर आणण्याला सुरुवात केली. अधिवेशन सुरू होण्याआधी भाजप आणि शिवसेनेने सरकारविरोधात निदर्शने केली. तर मनसेने वेगळी चूल मांडत राज्यपालांना घेराव घालून दुष्काळ आणि इतर प्रश्‍नांवर निवेदन दिले. मनसेच्या आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरही बहिष्कार घातला.

यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी राज ठाकरे यांना कोहिनूर जमिनीप्रकरणी चिमटा काढला. सुपारी घेऊन विरोधकांना कमकुवत करण्याचा आणि सत्ताधार्‍यांना मदत करण्याचा हा डाव तर नाही ना, असा सवालही खडसेंनी उपस्थित केला. तर शिवसेनेने मनसेला विश्‍वासघातकी ठरवण्याची संधीही सोडली नाही.

मनसेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप गटनेते सुभाष देसाई यांनी केला. विरोधकांमधील हे भांडण म्हणजे दोघांचे भाडणं तिसर्‍याचा लाभ होण्यासारखाच दिसत आहे. यामुळे सत्ताधारी मात्र खूश दिसत होते.

Leave a Comment