यशवंत सिन्हा नाराज: राजीनाम्याची धमकी

नवी दिल्ली: आपल्या शब्दाला पक्षात किंमत नसेल तर आपण खासदारकीचा राजीनामा देणे पसंत करू; असा इशारा माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी सोमवारी दिला. संसदीय भाजपच्या बैठकीतूनही सिन्हा निघून गेले. मात्र ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जसवंत सिंह यांना त्यांची समजूत काढण्यासाठी पाठविण्यात आले. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनीही सिन्हा यांच्याशी संपर्क साधून राजीनामा न देण्याची विनंती केली.

झारखंडच्या राजकारणात आपले मत विचारात घेतले जात नाही; अशी तक्रार सिन्हा यांनी यापूर्वीच केली होती. हजारीबाग येथील खासदार असलेल्या सिन्हा यांना झारखंड भाजपच्या अध्यक्षपदी केलेली रवींद्र राय यांची निवड रुचलेली नाही. त्याबाबतची नाराजी घेऊनच सिन्हा सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची रणनीती ठरविण्यासाठी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीला पोहोचले. त्यांनी बैठक सुरू होताच; ‘पक्षात आपल्या मताला किंमत नसताना संसदेत पक्षाचे प्रतिनिधित्व करणे योग्य होणार नाही;’ असे सांगत सिन्हा बैठकीतून निघून गेले.

जसवंत सिंह यांनी सिन्हा यांची समजूत काढण्यासाठी भेट घेतली. कोलकाताच्या दौर्यावर असलेल्या राजनाथ सिंह यांनी दोरध्वनॆवरून संपर्क साधून आपण दिल्लीत परतेपर्यंत राजीनामा देण्याचे पूल उचलू नये; असे आवाहन सिन्हा यांना केले.

Leave a Comment