भूकंपाच्या दोन वर्षानंतरही जपानवासियांचा संघर्ष सुरूच

टोकयो: जपानमधील प्रलंयकारी भूकंप, त्यातून निर्माण झालेली प्रचंड त्सुनामी आणि फुकूशिमा उणणुदुर्घटनेला आज दोन वर्षे पूर्ण झाली. तथापि दोन वर्षानंतरही किरणोत्सारावर नियंत्रण, उध्वस्त झालेल्या वसाहतींची पुर्नबांधणी आणि नवीन आर्थिक व उर्जा धोरणांसाठी जपानवासियांचा संर्घष आजही सुरू आहे.

या महाभयंकर नैसर्गिक आपत्तीच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त जपानमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्सुनामीत बळी पडलेल्या आपल्या नातेवाईकांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. या भूकंप व त्सुनामीनंतर आजही सुमारे ३ लाखाहून अधिक लोक विस्थापितांचे जीवन जगत आहेत. त्सुनामीचा सर्वाधिक फटका बसलेल्या ईशान्य किनार्‍यावर कुठल्याही बांधकामास पुन्हा सुरूवात करण्यात आलेली नाही.

या भीषण आपत्तीच्या दोन वर्षानंतरही बेपत्ता असलेल्या दोन हजार ६७६ जणांचा शोध अजूनही सुरू आहे. एकेकाळी ज्या भूमीवर घरे आणि मत्स्योद्योग मोठया दिमाखात उभे होते, त्याच केसेन्नुमाच्या जमिनीवर आता बर्फाची पसरलेली चादर नजरेस पडते. अनेकजण आजही उंचीवर तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या घरांमध्ये दिवस ढकलत आहेत. नव्या कायमस्वरूपी पक्कया, घरात जाण्यासाठी ते उत्सुक असले तरी त्यासाठी दहा वर्षेही लागू शकतात.

सुमारे दोन वर्षांपूर्वी जपानच्या इतिहासातील सर्वात मोठया म्हणजे नऊ रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्कयाने देश हादरला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रात असल्यामुळे प्रचंड त्सुनामी निर्माण झाल्या. त्यांनी किनारी प्रदेशात हाहाकार माजवला. फुकूशिमा या अणुप्रकल्पालाही त्याचा चांगलाच फटका बसला. यात सुमारे १९ हजार लोक मृत्युमुखी पडले होते.

या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतरही ‘अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा’, असे म्हणत जपानचे जिद्दी नागरिक विसकटलेली घडी पुन्हा सावरण्याचा अविरत प्रयत्न करत आहेत. दोन वर्षापूर्वीचा हा भूकंप खरंच भीतीदायक होता. पण माझा गाव सोडून दुसरीकडे जाण्याचे माझे कुठलेही नियोजन नाही. याऊलट, शहराच्या पुनर्बांधणीतच मी हातभार लावेन, हे ७५ वर्षीय केनिची ओई आजोबांचे शब्द त्याचीच प्रचिती देतात.

Leave a Comment