बेळगाव पालिकेवर मराठीचा झेंडा

बेळगाव- बेळगाव महापालिकेवर सत्ता मराठी मनाची येणार हे आता निश्चित झाले असून महाराष्‍ट्र एकीकरण समितीने बहुमत मिळवले आहे. ५८ जागा पैकी ३० जागा जिंकत पुन्हा सत्ता प्रस्थपित केली आहे. सोमवार सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच महाराष्‍ट्र एकीकरण समितीने आगेकूच सुरु ठेवली होती. विजयानंतर सर्वत्र जल्लोष करण्यात येत आहे.

काही काळ महाराष्‍ट्र एकीकरण समिती आणि कन्‍नड उमेदवारांमध्‍ये जोरदार रस्‍सीखेच सुरु होती. सर्वात धक्‍कादायक निकाल म्हणजे माजी महापौर मंदा बाळकुंद्री यांचा पराभव झाला आहे. सकाळीच महाराष्‍ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराने आघाडी घेतल्याने बहुमत मिळणार हे स्पष्ट झाले होते.

महाराष्‍ट्र एकीकरण समिती पुरस्‍कृत उमेदवार संज्‍योत बांदेकर यांचा विजय झाला आहे. आतापर्यंत ५८ जागांचे निकाल हाती आले असून त्‍यापैकी ३० ठिकाणी महाराष्‍ट्र एकीकरण समिती आणि समितीतर्फे पुरस्‍कृत उमेदवार विजयी झाले आहेत. त्‍यात माया कडोलकर, विजय पाटील, संदेश शिंदे, मेघा हळदणकर यांचा समावेश आहे. तर माजी उपमहापौर रेणू किल्‍लेकर यांचा पराभव झाला आहे. त्याशिवाय १५ कन्‍नड आणि उर्दू उमेदवार विजयी झाले आहेत.

बेळगावमध्‍ये ७ मार्चला मतदान झाले होते. बेळगाव महापालिकेवर गेल्या वेळी मराठीभाषकांची सत्ता आली होती. परंतु, महापौर आणि उपमहापौर १ नोव्हेंबर २०११ला काळादिनाच्या फेरीत सहभागी झाल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली व त्यानंतर महापालिका सभागृह बरखास्त करण्यात आले. त्‍यानंतर तब्‍बल १४ महिन्‍यांनी मतदान झाले.

Leave a Comment