बिजिंग दि.११ – अतिवेगवान रेल्वेचे जाळे विणून जगात आघाडी घेतलेल्या चीनने रेल्वे विभागात होत असलेला भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. वेगाने प्रगतीपथावर असलेल्या चीनमध्ये रेल्वेचे जाळे ज्या प्रमाणात वाढले आहे, त्याचप्रमाणात रेल्वे अपघातांचे प्रमाणही वाढते आहे. गेल्या काही वर्षात चीन सरकारने रेल्वमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूकही केलेली आहे. मात्र भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि रेल्वेचे वाढते अपघात यामुळे हा विभाग टीकेचे लक्ष्य बनला आहे असे समजते.
चीन सरकारने सर्वच सरकारी खात्यांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालय बंद करण्याचा विचार २००८मध्येच प्रथम पुढे आला होता. आता वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे संसदेत चर्चा झाल्यानंतर हे मंत्रालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे रेल्वे विभाग वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीत येणार असून त्याचे आर्थिक व्यवस्थापन वित्तिय मंत्रालयाकडे राहणार आहे असे समजते. यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालणे तसेच रेल्वेची क्षमता अधिक वाढविणे शक्य होईल असा सरकारचा दावा आहे.