कर्नाटकात भाजप, येडीयुरप्पांचा धुव्वा; काँग्रेस विजयी

गलोर: कर्नाटकात महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. त्यात काँग्रेसने लक्षणीय यश मिळवले असून भाजप आणि बी एस येडियुरप्पा यांच्या पक्षांची मोठी पिछेहाट झाली आहे. जिंकलेल्या जागांवरून अंदाज बांधला तर काँग्रेस पहिल्या स्थानावर, संयुक्त जनता दल दुसर्‍या स्थानावर तर भाजप तिसर्‍या स्थानावर फेकला गेला असल्याचे चित्र आहे.

या राज्यात केवळ दोन महिन्यांनीच विधानसभांच्या निवडणुका होत असून त्या निवडणुक निकालांची नांदीच या निवडणुकांतून पहायला मिळाली आहे असे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. स्थानिक स्वराज संस्थांची ही निवडणूक विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल मानली गेली होती.

नगरपालिका आणि महानगरपालिकांचे एकूण सुमारे पाच हजार वॉर्ड आहेत. त्यापैकी साडेचार हजार वॉर्डांचे निकाल दुपारपर्यंत जाहीर झाले. त्यात काँग्रेसने १८०० पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. एच डी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलाला ८७० जागा मिळाल्या आहेत तर सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला सुमारे ८०० जागा मिळाल्या आहेत.

भाजपमधून फुटून वेगळा कर्नाटक जनता पक्ष स्थापन करणार्‍या येडियुरप्पा यांचा पक्ष तसेच बी श्रीमालू यांची बीएसआर काँग्रेस यांना अपेक्षित यश मिळाले नाही परंतु त्यांनी भाजपचेच नुकसान केल्याची बाब यातून समोर आली आहे. येडियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्षाला सुमारे २५० तर बीएसआर काँग्रेस या पक्षाला सुमारे ७७ जागा मिळाल्या आहेत.

सात शहरातील महापालिका, ४३ नगरपालिका, ६५ नगरपरिषदा आणि ९२ पंचायतींच्या या निवडणुकांसाठी ७ मार्चला मतदान झाले होते. या सर्व ठिकाणी एकूण ४८७६ वॉर्ड आहेत. त्यातील ८५ वॉर्डात बिनवविरोध निवडणूक झाली.महापालिका निवडणुकीमध्ये दावणगिरी, मंगलोर, आणि बेल्लारी या महालिकांमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. बेल्लारीत भाजपचा साफ धुव्वा उडाला. तेथे त्यांना एकही जागा मिळू शकली नाही. म्हैसूर, गुलबर्गा या महालिकांमध्ये त्रिशंकु स्थिती निर्माण झाली आहे.

या निवडणुक निकालावर प्रतिक्रीया देताना मुख्यमंत्री जगदीश शेट्टर म्हणाले की; भाजपचा सर्वच ठिकाणी साफ धुव्वा होईल असे दावे काही जणांनी केले होते, परंतु भाजपची तितकी वाईट स्थिती झालेली दिसली नाही. अर्थात हे जनमत कोणा एका पक्षाच्या बाजूने निर्वीवादपणे झुकलेलले नाही. वास्तविक पहाता हा जनतेने सर्वच पक्षांना दिलेला धोक्याचा इशारा आहे. या निवडणुकांमध्ये अपक्ष उमेद्वार मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत याचा अर्थ लोकांनी स्थानिक मुद्द्यावर मतदान केले आहे.