नवी दिल्ली – भारतीय फौजांची हानी घडविण्याच्या उद्दिष्टाने गेल्या वर्षी २४ आणि २६ नोव्हेंबरला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानातील काही घटकांकडून भूसुरुंगाची पेरणी करण्यात आली होती; अशी माहिती संरक्षणमंत्री ए.के. अँटोनी यांनी आज लोकसभेत दिली.
भारतीय फौजांना गस्त घालण्यापासून रोखण्यासाठी भारतीय प्रदेशात पाकीस्तानी लष्कराकडून सुरूंगाची पेरणी करण्यात येते का, असा लेखी प्रश्न संरक्षणमंत्र्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना अँटोनी यांनी पाकीस्तान वेळोवेळी भारतीय फौजांची हानी घडविण्याच्या उद्दिष्टाने सुरूंगाची पेरणी करत असल्याचा गुप्तचर खात्याचा अहवाल आहे, असे सांगितले.
पाकीस्तानकडून वारंवार होणार्या युद्धबंदीच्या उल्लंघनाचा मुद्दा योग्य यंत्रणेद्वारे त्या देशाकडे उपस्थित करण्यात आला आहे, असेही त्यांनी नमूद केले. यावर्षी जानेवारीमध्ये कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकीस्तानी लष्कराने भारतीय हद्दीत प्रवेश करत दोघा जवानांची हत्या केली होती. त्यापैकी एका जवानाचा शिरच्छेद करून त्याचे शीर आपल्यासोबत नेण्याचा घृणास्पद प्रकारही पाक लष्कराने केला होता.