‘गोळ्या घाला; पण तिहारला पाठवू नका’

नवी दिल्ली: आम्हाला गोळ्या घालून ठार करा; मात्र पुन्हा तिहार कारागृहात पाठवू नका; अशी विनंती राजधानीत धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील अन्य आरोपींनी न्यायालयाला केली. न्यायालयाने अर्थातच त्यांची मागणी फेटाळून लावली मात्र या आरोपींच्या सुरक्षिततेसाठी केल्या जाणार्या उपायांचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला दिले.

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक आरोपी रामसिंग याने सोमवारी पहाटे तिहार कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमुळे तिहार कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र रामसिंग याचे वकील आणि पिता यांनी रमसिंगने आत्महत्या केली नसून त्याला कट करून ठार मारण्यात आल्याचा आरोप केला आहे.

रामसिंग याची आत्महत्या हा कारागृह प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम असून या मृत्यूची न्यायिक चौकशी केली जात आहे. त्यातून हा प्रकार कसा घडला; यावर लवकरच प्रकाश पडेल; अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तिहार कारागृह प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

दिल्लीत धावत्या बसमध्ये युवतीवर सामूहिक बलात्कार करून तला आणि तिच्या मित्राला अमानुष मारहाण करण्यात आली. हे युवती उपचारादरम्यान मरण पावली. यासंदर्भात खून, बलात्कार, लूटमार अशा गुन्ह्यांखाली एका अल्पवयीन आरोपीसह ५जणांना अटक करण्यात आली. रामसिंग हा या प्रकरणात पकडण्यात आलेला पहिला आरोपी आहे.

रामसिंगला सोमवारी साकेत न्यायालयात हजार करण्यात येणार होते. मात्र त्याने पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आपल्या अंगावरील कपड्यांचा फास बनवून गळफास घेतला आणि आत्महत्या केली. रामसिंग याला अटक करून तिहार कारागृहात आणल्यावर इतर कैद्यांनी त्याला बेदम चोप दिला होता.