कोल्हापुरी चपलेची ललनांना मोहिनी

chappal

कोल्हापूर – महाराष्ट्रातील ग्रामदैवतेचे हे शहर अनेक कारणांनी जगात प्रसिद्ध आहे. कोल्हापूरी दागिने, कोल्हापूरी चपला आणि कोल्हापुरी मिसळ याबरोबरच कोल्हापूरी भाषा ही त्याची ठळक वैशिष्ठ्ये. जगात दर तासाला फॅशन बदलत असतानाही गेली कित्येक वर्षे कोल्हापुरी चपलांनी मात्र फॅशन जगतावर अक्षरशः दादागिरी केली असून आजही कोल्हापुरी चपलेची क्रेझ कणभरही कमी झालेली नाही. पुरूषांप्रमाणेच महिला वर्गाला या चप्पल प्रकारने भुरळ घातली असून आता कोल्हापूरी चप्पल उत्पादकही आपली परंपरा थोडी बाजूला ठेवून बाजारात हातोहात खपतील अशा प्रकारे हा पादप्रकार बनवू लागले आहेत.

सुबक आकार, चॉकलेटी किवा फिकट चॉकलेटी रंग, लाल गोंडा, थोडे फार नक्षीकाम आणि अस्सल कातड्याची ही पादत्राणे केवळ भारतातच नव्हे तर जगातही लोकप्रिय आहेत. केवळ भारतातील मोठी शहरेच नव्हे तर थायलंड, इंग्लंड सारख्या देशातही या चपला विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इतिहास प्रसिद्ध या पादत्राणांनी आता मात्र आपली स्टाईल थोडी बदलली आहे. महिला वर्गाला मॅचिंगची असलेली क्रेझ लक्षात घेऊन आता पारंपारिक रंगाबरोबरच विविध रंगात म्हणजे हिरवा, लाल,जांभळा, गुलाबी, सोनेरी, चंदेरी अशा विविध रंगात या चपला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यावर पारंपारिक कारागिरीबरोबरच आता भरतकाम, मणीकामही केले जात आहे.

फॅशनेबल महिलांना या चपलांची मोहिनी जबरदस्त आहे आणि केवळ भारतीयच नव्हे तर पाश्चात्य पोशाखावरही या चपला मस्त शोभतात असे फॅशन आयकॉन महिलांचे म्हणणे आहे. गुगल वर्ल्ड प्रोफेशनल नेहा गुप्ता यांच्या मते या चपलांचा ट्रेंड कधीच जुना होणार नाही. त्यांच्या स्वतःकडे विविध रंगातल्या पाच कोल्हापुरी चपलांचे जोड आहेत. शिवाय या किमतीला सहज परवडण्याजोग्या असल्याने एकच महागडी चप्पल घेण्यापेक्षा त्याच किमतीत पाच सहा जोड सहज येतात. हिवाळा, उन्हाळ्यात वापरायला अत्यंत योग्य असल्याने त्या घेतल्यासारख्या भरपूर वापरल्याही जातात असेही काही फॅशनेबल तरुणींचे म्हणणे आहे. मात्र काही जणी आवर्जून पारंपारिक रंगांतील चपलांनाच प्राधान्य देतात.

एकंदरीत कोल्हापूरी चपला बाजारात चांगल्याच चर्चेत आहेत म्हणायचे !
————

Leave a Comment