राज – उद्धव दिलजमाई अशक्य – रामदास आठवले

पुणे: शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील लढाई नेतृत्वाच्या सत्तासंघर्षातील असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकीर्दीत न झालेली राज आणि उद्धव दिलजमाई यापुढे होईल; अशी शक्यता वाटत नसल्याचे परखड मत रिपब्लिकन पक्षाचे (ए) अध्यक्ष रामदास आठवले यांनी ‘माझा पेपर’शी बोलताना व्यक्त केले. सत्ताधारी पक्षाच्या मतदारांपैकी तरुण राज यांच्याकडे आकृष्ट होत असून त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविणे महायुतीला फायदेशीर असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र ‘मनसे’बाबत आपली भूमिका मावळ करीत आठवले यांनी मनसेचा महायुतीत समावेश करण्याचा प्रस्ताव आल्यास शिवसेना, भाजप आणि रिपब्लिकन पक्ष एकत्रितपणे चर्चा करून त्याबाबत विचार करेल; असेही ते म्हणाले.

शिवसेना आणि भाजपच्या पारंपारिक मतांना दलित मतांची साथ मिळाल्यास महायुतीला सत्ता प्राप्त करण्यासाठी मनसेच्या मदतीची आवश्यकता नसल्याचे सांगून आठवले म्हणाले की; सर्वसामान्य मराठी माणसाच्या अपेक्षा लक्षात घेऊन उद्धव यांनी ‘दै. सामना’च्या माध्यमातून मनसेला साद घातली. मात्र हा धोरणात्मक निर्णय नव्हता. उद्धव यांची ही कृती निव्वळ राजकीय अथवा भावनिक असावी; अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. आता राज यांनी आपल्याला ‘टाळी वाजवायचीच नाही;’ अशी भूमिका जाहीर केल्याने याबाबत चर्चा अप्रस्तुत असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.
मनसेला महायुतीत समाविष्ट करून घेण्याबाबत घटक पक्षातील कोणताही एक पक्ष एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही. मनसेला महायुतीत सहभागी करण्याबाबत शिवसेना कार्यप्रमुख गंभीर असते तर त्यांनी भाजप आणि रिपब्लिकन पक्षाबरोबर निश्चितपणे चर्चा केली असती; असा विश्वास व्यक्त करताना आठवले यांनी मनसेला महायुतीत सहभागी करण्याबाबत चर्चा नसल्याचे स्पष्ट केले. महायुतीत नवा भागीदार घेण्यासाठी शिवसेना, भाजप आणि रिपब्लिकन पक्ष एकत्रित चर्चा करून निर्णय घेतील; असा दावा आठवले यांनी केला.

राज्याच्या शहरी भागात मनसेची ताकद वाढत असून प्रामुख्याने तरुण वर्ग राज यांच्या नेतृत्वाकडे आकृष्ट होत असल्याचे निरीक्षण आठवले यांनी नोंदविले. यापूर्वी झालेल्या निवडणुकात मनसेने घेतलेली मते सत्ताधारी आघाडीला फायदेशीर ठरून भाजप- शिवसेना युतीच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचेही आठवले यांनी मान्य केले. मात्र मागच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीत दलित मते युतीच्या मागे नसल्याचे आठवले यांनी निदर्शनास आणून दिले. विद्यमान सरकारच्या कारभाराला जनता वैतागली असून महागाई आणि भ्रष्टाचार याबाबत लोकांमध्ये संताप आहे. या पार्श्वभूमीवर भाजप- सेना युतीला मिळालेला दलित मतांचा पाठींबा लक्षात घेता आगामी निवडणुकीत विधानसभेवर ‘भगवा-निळा’ झेंडा फ़डकण्यचे दिवस दूर नाहीत; असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

हे उद्दिष्ट गाठण्यासाठी महायुतीला मनसेच्या मदतीची अपेक्षा नाही. उलट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मतदारांपैकी युवा वर्गाला राज यांच्या मनसेचे आकर्षण असून त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढविणे महायुतीच्या फायद्याचे आहे; असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

Leave a Comment