मुंबईच्या विमानतळावर ९७ कासवे जप्त

मुंबई: मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून ९७ कासवे जप्त करण्यात आली. मोहंमद अरिफ असे या प्रवाशाचे नाव असून तो पाटण्याचा आहे. ही कासवे घेऊन तो थाई एअरलाईन्सच्या विमानाने बँकॉककडे जात होता. त्यावेळी त्याला विमानतळावरच अटक करण्यात आली.

त्याच्याकडे असलेले सामान स्क्रीनिंग मशिनमधून पाहिले जात असता तेथील अधिकार्‍यांना त्याच्या बॅगेत काही तरी संशयास्पद असल्याचे आढळून आले. त्यांनी प्रत्यक्ष बॅग उघडून तपासणी केली असता त्यांना त्यात ९७ छोटी कासवे आढळून आली. बॅगेतील वेगवेगळ्या पाऊच मध्ये त्याने ही कासवे ठेवली होती विशेष म्हणजे ती सारी जिवंत कासवे होती.

या प्रकरणी पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याने म्हटले आहे की; नसीर नावाच्या आपल्या एका मित्राने आपल्याला ही बॅग संबंधितांकडे सुपूर्त करण्यासाठी दिली होती. त्यासाठी आपल्याला तीनशे डॉलर्स इतकी रक्कम देण्यात आली होती. पोलिस, कस्टम आणि वन विभागाचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment