दहावीच्या परीक्षा संकटात; शिक्षकांचा उद्यापासून बहिष्कार

मुंबई: गेल्या काही दिवसापासून राज्यात बारावीच्या परीक्षांचा गोंधळ सुरु आहे. त्यातून अजून मार्ग निघालेला नसताना आता दहावीच्या परीक्षा सुद्धा संकटात आल्या आहेत. राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील बारा हजार शिक्षकांनी सोमवारपासून दहावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षकांनी उद्यापासून पर्यवेक्षण आणि पेपर न तपासण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून आझाद मैदानात त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे याचा फटका आता दहावीच्या निकालाला बसणार असून, त्याला उशीर लागण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसापासून राज्यात बारावीच्या परीक्षांचा सावळा गोंधळ सुरु आहे. त्यातच आता
विनाअनुदानित शाळांना अनुदान लागू करण्यासाठी होणा-या मूल्यांकन पद्धतीचा सुधारित अध्यादेश जाहीर होत नाही, तोपर्यंत शिक्षकांनी दहावी परीक्षेचे काम करण्यास नकार दिला आहे.त्याचबरोबर मागण्या मान्य होईपर्यंत, शिक्षक आझाद मैदानात सोमवारपासून आंदोलन करणार आहेत.

बारावीच्या पेपर तपासणीवरचा बहिष्कार लांबला असल्याने त्याचा फटका दहावीच्या निकालाला बसण्याची शक्यता आहे. बारावी परीक्षाचे सर्व तपासणीचे काम संपल्याशिवाय दहावीच्या निकालाचे काम बोर्डाला सुरु करता येणार नाही. त्यामुळे यावर्षी दहावीचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. एकंदरीत राज्यातील प्राध्यापक व शिक्षकानी ऐन परीक्षेच्या काळात सरकारला वेठीस धरल्याने संकटात वाढ झाली आहे.