विकास केल्यास जनता माफ करते-मोदी

गुजरातची सूत्रे संभाळत असताना माझ्या हातून काही चूका झाल्या, त्या मला मान्य आहेत. तुम्ही जर विकास कामे करीत असाल तर या चुकाबद्दल जनता तुम्हाला माफ करते, असे सांगत रविवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील भारतीयांना साद घातली. दरम्यान,एक प्रकारे मोदी यांनी गुजरातमधील जातीय दंगल ही त्यांची चूक असल्याचे कबूल केले असे राजकीय वर्तुळातून मानले जात आहे.

मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून अमेरिका आणि कॅनडातील अनिवासी भारतीयांना रविवारी मार्गदर्शन केले. त्यांनी मार्गदर्शनपर भाषणातून गुजरातच्या विकासाचे गुणगान गाताना त्यांनी याठिकाणी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा उल्लेख मात्र टाळला. पुढे बोलताना मोदी म्हणाले, ‘विकास हेच सगळ्या प्रश्नांवर उत्तर आहे, हे मी गुजरातमधील माझ्या १२-१३ वर्षांच्या अनुभवावरून सांगतो. गुजरातच्या जनतेने नेहमीच विकासाला कौल देऊन देशालाही ते दाखवून दिलेय,’ असे मोदी म्हणाले. ‘गुजरातच्या विकासाची आज जगभरात चर्चा आहे. जेव्हा अमेरिकेत मंदी होती तेव्हाही गुजरातमध्ये विकासाची गंगा वाहत होती. २००१ मध्ये जी इच्छाशक्ती आणि विकासाचा ध्यास मी बाळगला होता, तोच उत्साह आजही माझ्यात आहे. कोणत्याही मान-सन्मानासाठी नाही, तर ६ कोटी गुजराती जनतेच्या हितासाठी मी झटत आहे.’

काही दिवसापूर्वी व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक फोरमने मोदींना मुख्य वक्ता म्हणून निमंत्रित केले होते. मात्र नंतर त्यांचे भाषण अचानक रद्द करण्यात आल्याने मोठे वादंग उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर ओवरसीज फ्रेन्ड्स ऑफ बीजेपीने मोदींच्या भाषणाचा हा कार्यक्रम आयोजित करून त्याला उत्तर दिले. अमेरिकेच्या एडिसन, न्यू जर्सी, शिकागो, इलिनॉयस या भागात हे भाषण नागरिकांनी ऐकले.

Leave a Comment