नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचे संकेत दिल्यावर राज्यातील काँग्रेसचे खासदारही स्वबळाचा नारा देण्याची शक्यता आहे. उद्या होणार्या बैठकीत ते पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पुढील लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढविण्याची मागणी करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीवर पूर्णपणे विसंबून राहण्यापेक्षा काँग्रेसने सर्व जागा स्वबळावर लढण्यासाठी तयार राहायला हवे; असे पक्षाच्या खासदार रजनी पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या अनपेक्षित कृतीमुळे काँग्रेसच्या नियोजनावर पाणी न पडण्यासाठी हे गरजेचे असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.
काँग्रेसबरोबर आघाडी असतानाही सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपण विधानसभेच्या २८८ जागा लढविण्याची तयारी करू; असे प्रतिपादन राष्ट्रवादीने नुकतेच केल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
मात्र शिवसेना, भाजप, मनसेची विशालयुती निर्माण करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही काँग्रेसने एकत्रित निवडणुका लढविणेच हिताचे आहे; असेही काही खासदारांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रात पुढील वर्षाच्या उत्तरार्धात विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. त्यापूर्वी, लोकसभा निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर दोन्ही काँग्रेसची आघाडी कायम राहू शकते.
दोन आठवडयांपूर्वी मुंबई दौर्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांसह खासदारांशीही सविस्तर चर्चा केली होती. सन २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ४८ जागांपैकी काँग्रेसने १७ तर राष्ट्रवादीने ८ जागांवर विजय मिळविला होता. विधानसभेत काँग्रेसचे ८२ तर राष्ट्रवादीचे ६२ आमदार आहेत.
राष्ट्रकुल घोटाळाप्रकरणी पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने पुण्याचा जागेवरही हक्क सांगण्यास सुरूवात केली
महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून अधिक निधी देण्यावरही सोमवारी राहुल यांच्याशी होणार्या या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे, नवी मुंबई विमानतळासह राज्याच्या प्रलंबित प्रकल्पाचा मुद्दाही या चर्चेत उपस्थित केला जाणार आहे.
दरम्यान; आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये २८८ पैकी १४५ जागांची मागणी करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. तसेच किमान १३० जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी करण्याचा निर्धार करतानाच; जागांची मागणी काँग्रेसला मान्य नसल्यास ’एकला चलो रे’चा नारा देखील देण्यात आला.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रदेश समन्वय समितीची आकुर्डी येथे समितीचे महासमन्वयक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी ही बैठक घेण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडे विधानसभेच्या १४५ जागांची मागणी केली जाणार आहे. त्यापैकी पक्षाचे किमान १३० उमेदवार निवडून आणण्याचे उद्दीष्टही यावेळी निश्चित करण्यात आले.
काँग्रेसने १४५ जागांची मागणी मान्य न केल्यास सर्वच २८८ जागा लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवली आहे. काँग्रेसबरोबर जायला राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक आहे, मात्र काँग्रेसने ताणून धरल्यास ’एकला चलो’चा नारा दिला जाईल; असे पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.