मंत्रालयाला पुन्हा आग; आटोक्यात आणण्यात यश

मुंबई – महाराष्ट्र राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयास शनिवारी दुपारी अचानक आग लागली. मंत्रालयाला पुन्हा आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या चौथ्या मजल्यावर वेल्डिंगचे काम सुरू असताना हा भडका उडाल्याचे समजते. यामध्ये कसलीच जीवित अथवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.

पोलिस सूत्राने दिलेल्या माहिती नुसार, मंत्रालयास शनिवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे पाच बंब तातडीने घटनास्थळी पोहोचले असून, आग झटपट आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले असल्याचे समजते. त्वरित आग आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळले आहे.

काही दिवासापूर्वीच मंत्रालयास आग लागल्याने मोठे नुकसान झाले होते. या आगीत चार जणांना जीव गमवावा लागला होता. तर दोन माजले पूर्णपणे जळून खाक झाले होते. त्यात अनेक महत्वाची कागदपत्रे जाळून खाक झाले होते. ही घटना अजून ताजी असताना आगीची घटना पुन्हा घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या मजल्यावर किरकोळ काम सुरू असल्याने तेथे कोणतीही महत्त्वाची कागदपत्रे नव्हती. आज महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने मंत्रालयाच्या कर्मचा-यांना सुटी आहे. वेल्डिंगचे काम सुरू असताना आग लागल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment