अलिबाग – वीकएंड पिकनिक स्पॉट

alibaug

रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे निसर्गसौदर्याने परिपूर्ण असे टुमदार शहर वीकएंड पिकनिक साठी सर्वदा हॉटस्पॉट असलेले ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्यापासून जवळ असलेल्या या ठिकाणाला सुंदर समुद्रकिनाऱ्याचे वरदान लाभलेले आहे. या छोट्याश्या गावांत अनेक उद्योग असले तरी मु्ख्य उद्योग शेती हाच आहे. नारळी पोफळीची घनदाट बने, समुद्रावरचा मुक्त वारा, निरव शांतता, आणि कोकणी पद्धतीचे सुग्रास भोजन देणार्याय अनेक घरगुती खानावळी ही या गावाची वैशिष्ठ्ये सांगता येतील. महाराष्ट्राचे गोवा अशीही या गावाची ओळख आहे..
alibaug2
या गावाच्या तीन बाजू समुद्राने वेढलेल्या आहेत. अलिची बाग अशी या गावाच्या नावाची उत्पत्ती सांगतात. बेने इस्त्रायली ज्यू अलि याच्या नावावरून गावाला अलिबाग हे नांव मिळाले. या गावाला ऐतिहासिक महत्वही आहेच. आपल्या शिवाजी राजांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी १७ व्या शतकात हे गांव विकत घेतले असे सांगितले जाते. कुलाबा येथे शिवाजी महाराजांनी किल्ला बांधल्यानंतर या गावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
alibaug1
मुंबईच्या दक्षिण टोकावर वसलेले अलिबाग मुंबईपासून रस्त्याने तीन तासांच्या तर फेरी बोटीने केवळ एक तासाच्या अंतरावर आहे. नारळी पोफळीच्या बनांबरोबर येथे चिक्कूची झाडेही फार मोठ्या प्रमाणावर आहेत. टिपिकल कोकणी कौलारू घरे, छोट्या गल्ल्या, शांत सुंदर सम्रुद्र किनारा, मोकळा वारा असलेल्या या गावाला भेट द्यायला कोणताही सिझन चालेल. मात्र पावसाळ्यातली मजा कांही औरच. पावसाने सुस्नात झालेली नारळी पोफळीची व अन्य प्रकारची झाडे आणि ओल्या हवेचा मस्त सुगंध शरीर आणि मनाला उल्हसित करणारच.
alibaug
गांव छोटेसे आहे पण टुमदार आहे. गांवात असलेले ज्यू प्रार्थनास्थळ आणि काळी वाळू असलेला अथांग किनारा ही मुख्य आकर्षणे. शहराच्या मध्यभागी आहे अलिशाह बाबा मजहर. येथून कुलाबा फोर्टचेही दर्शन होते. गावापासून साधारण १३ किमीवर अंतरावर असलेल्या कणकेश्वर शिवमंदिराला भेट द्यायला विसरू नये. ९०० फूट उंचीच्या टेकडीवर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून वर गेले की वर चढण्यात आलेला सारा शीण क्षणांत संपून जातो. येथे अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत तसेच मंदिरामागे पुष्करिणी कुंड ही आहे.
alibaug3
हाताशी वेळ असलाच तर किहिम, वर्सोली बीचलाही जाता येते. अन्यथा सकाळी पोटभर न्याहरी आणि दुपारी मस्त कोकणी जेवण म्हणजे मासे हवे असल्यास मासे, तांदळाची भाकरी, सोलकढी, भात किंवा अगदी सात्विक जेवण हवे असल्यास उकडीचे मोदक, भात भाजी  असाही मेनू मिळू शकतो. मात्र त्यासाठी आधी ऑर्डर द्यावी लागते. या गावात राहण्यासाठी समुद्र किनार्याणवर चांगली हॉटेल्स आहेत पण घरातूनही राहण्याची सोय होऊ शकते. अशा छोट्याश्या वाडीत मुक्काम टाकला तर कोकणी माणसाचे जीवन जवळून पाहण्याचा अनुभव घेता येतो. उन्हाळ्यात गेलात तर ओले काजू, फणस सेवेला हजर असतात. कोकमाचे गार सरबत पिऊन जिवाला किती थंडावा मिळतो हे सांगून कळणार नाही तर तेथे जाऊन प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा. मग कधी निघताय अलिबागला?

Leave a Comment