ह्यूगो चावेझ यांचा देह कायमस्वरूपी जतन करणार

कॅराकस दि.८ – व्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो चावेझ यांचा मृतदेह लष्करी संग्रहालयात कायमस्वरूपी काचेच्या पेटीत जतन करण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष निकोलस मदुरो यांनी गुरूवारी रात्री जाहीर केले आहे. शुक्रवारी ह्युगो यांची अंत्ययात्रा काढण्यात येत असून या अंत्ययात्रेसाठी तीस देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. भारतातर्फे सचिन पायलट या अंत्ययात्रेसाठी रवाना झाले आहेत.

फ्युनरल पार पाडल्यानंतर व्हेनेझुएलाच्या राज्यघटनेप्रमाणे तीस दिवसांच्या आत निवडणुका जाहीर केल्या जातील असे नॅशनल असेब्लीचे प्रवक्ते म्हणाले. उपाध्यक्ष निकोलस हेच ह्युगो यांचे वारसदार मानले जातात. त्यामुळे ते अध्यक्षपदासाठी उमेदवार असतील. शुक्रवारी ह्युगो यांची अंत्ययात्रा सकाळी ११ वाजता सुरू करण्यात येणार आहे. हयुगो यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी प्रचंड संख्येने जनसमुदाय जमला असून अंत्यदर्शनासाठी १० तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

निकोलस म्हणाले की ह्युगो यांच्यासारखा नेता या देशाला मिळाल्यामुळेच आमचा स्वाभिमान जपला गेला आणि त्याचा विसर कधीच पडू नये अशी जनतेची इच्छा आहे. यामुळेच ह्युगो यांचा देह कायमस्वरूपी जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तो लष्करी संग्रहायात ठेवण्यात येईल. त्यांच्या दर्शनामुळे जनतेला नेहमीच प्रेरणा मिळणार आहे.

मंगळवारी रात्री उशीरा ह्युगो यांचे कर्करोगाने निधन झाले असून गेली दोन वर्षे ते या रोगाशी झुंज देत होते.

Leave a Comment