मद्यपि बापाकडून तीन वर्षीय मुलीवर बलात्कार

भोपाळ: केरळ पाठोपाठ तीन वर्षाच्या अजाण बालिकेवर बलात्काराचा आणखी एक प्रकार उघडकीला आला असून माणुसकीला लाजिरवाणी बाब म्हणजे हा बलात्कार तिच्या जन्मदात्या पित्यानेच मद्यधुंद अवस्थेत केला. या नराधमाला पोलिसांनी जेरबंद केले आहे.

एक वर्षापूर्वी आईच्या मायेपासून पारख्या झालेल्या या पीडीत मुलीचा रोजंदारीवर काम करणारा बाप गुरुवारी संध्याकाळी दारूच्या नशेत तर्र अवस्थेत घरी आला आणि त्याने आपल्या पोटाच्या गोळ्यावर अघोरी बलात्कार केला. या मुलीच्या आर्त किंकाळ्या ऐकून शेजारी राहणारे नागरिक तिच्या घराकडे धावले आणि त्यांनी हे अमानुष दृश्य पाहिले. त्यांनी या नराधमाला चांगला चोप देऊन पोलिसांना पाचारण केले.

तत्काळ घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मद्यधुंद बापाला अटक करून पीडीत मुलीची रवानगी स्थानिक रुग्णालयात केली. या बालिकेवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.