अनफिट खेळाडू आयपीएलसाठी मात्र ‘फिट’

मुंबई- यंदाच्या ‘आयपीएल’स्पर्धेसाठीच्या नऊ संघांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. त्या संघामध्ये टीम इंडियातील काही अनफिट खेळाडूना देखील समावेश करण्यात आला आहे. फिटनेसच्या कारणास्तव टीम इंडियाबाहेर बसलेल्या खेळाडूंचा या संघामध्ये स्थान देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यापूर्वी झालेल्याआयपीएलमध्ये टीम इंडियातील काही प्रमुख खेळाडूंनी दुखापती बाजूला ठेवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा परिणाम टीम इंडियाच्या कामगिरीवर झाला होता. त्यांनतर काही जणांनी या प्रकाराबाबत आवाज उचलल्यानंतर असा प्रकार काहीसा बंद झाला होता.
वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, जहीर खान, इरफान पठाण, मुनाफ पटेल या खेळाडूंनी आपापल्या संघासाठी दुखापती बाजूला ठेवून खेळण्याचा प्रयत्न केला होता.

२०१३च्या आयपीएल स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघामध्ये सध्या टीम इंडियाबाहेर बसलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय वेगवान गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेला जहीर खान मुंबईच्या वतीने रणजी सामन्यात खेळत असताना जायबंदी झाला. त्याने त्यानंतर बंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये जाऊन आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले आहे. तेथील डॉक्टरांनी त्याला पूर्ण फिट झाला नसल्याचे कळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत खेळण्याऐवजी त्याने तंदुरुस्ती वाढवून पूर्णपणे फिट होण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथील पहिल्याच कसोटीत जायबंदी झालेला उमेश यादव याच्या फिटनेसबाबतही सर्वजण अंधारात आहेत. मात्र, दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी त्याला खेळावे लागेल. वरुण अरुण हादेखील भारतीय संघात येऊन फिटनेसमुळे बाहेर गेलेला खेळाडू आयपीएल संघात आहे. त्याशिवाय अष्टपैलू इरफान पठाण, मुनाफ पटेल यांनादेखील आयपीएल स्पर्धेत खेळण्यात रस आहे. त्यामुळे अनफिट असलेले हे टीम इंडियातील खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळणार की नाही यावरून प्रश्न उपस्थित होत आहेत .

Leave a Comment