नवी दिल्ली दि.८ – सोनीने त्यांच्या महत्त्वाकांक्षी एक्सपिरीया स्मार्टफोनच्या विक्रीतून भारतात २०१३-१४ सालासाठी ३५०० कोटींचा महसूल मिळविण्याचे ध्येय ठेवले आहे. हे ध्येय गाठता यावे यासाठी कंपनीने मार्केटिंगवर ३०० कोटी रूपये खर्च करण्याची तयारी केली आहे असेही समजते.
एक्सपिरीया १२ मार्चपासून भारतात लाँच होत आहे. हा स्मार्टफोन लाँच होताच त्याची तिप्पट प्रमाणात विक्री करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत असे व्यवस्थापकीय संचालक केनिचिरो हिबी यांनी सांगितले. धूळ, पाणी प्रतिबंधक हा स्मार्टफोन ३८,९९० रूपयांना मिळू शकणार आहे. पाच इंची स्क्रीन,१३ मेगापिक्सल कॅमेरा असलेला हा फोन अँड्राईड सह आहे.
विक्री वाढविण्यासाठी केलेल्या उपाययोजनात युवा आयकॉन कतरिना कैफ हिैची ब्रँड अँबॅसिडर म्हणून करण्यात आलेली नेमणूक जशी समाविष्ट आहे त्याचप्रमाणे देशभरात ८००० नवी विक्री दालने आणि ३०० सेवा केंद्रेही सुरू करण्यात येत आहेत. सर्विसिंग साठी ग्राहकाने फोन दिल्यास त्याला स्टँडबाय हँडसेट देण्याचीही कंपनीची योजना आहे. सोनी फोर जी तंत्रज्ञानावर आधारित एक्सपिरिया टॅब्लेटही मे महिन्यात बाजारात लाँच करणार आहे असेही सांगितले गेले आहे.