पाक पंतप्रधानच्या भारत दौ-याला विरोध

नवी दिल्ली- पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांच्या भारत दौ-याला विरोध होत आहे. अश्रफ हे शनिवारी भारताच्या एक दिवसाच्या खासगी दौ-यावर येणार आहेत. शहीद हेमराज यांच्या कुटुंबियांनी या त्यांच्या दौ-यास भारत सरकारने परवानगी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे आता दिल्लीतील राजकीय वातावरणही तापू लागले आहे.

पाकिस्तानकडून भारतीय जवानांच्या शिरच्छेदानंतर ही भेट घडत आहे. त्या पार्श्वभूमीवर,याला महत्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान अश्रफ यांच्या अशा स्वरूपाच्या भारत भेटीस परवानगी देऊच नये असे मत शहीद हेमराज यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केले आहे. शहीद हेमराज यांच्या कुटुंबियांनी विरोध दर्शविल्याने व त्यांच्यासोबत कोणत्याही मुद्द्यावर चर्चा होणार नसल्याने भारत सरकार या दौ-याबाबत काय निर्णय घेणार हे मात्र समजू शकले नाही.

‘पाकिस्तानचे पंतप्रधान अश्रफ त्यांच्या कुटुंबीयांसह शनिवारी अजमेर येथील दर्ग्याला भेट देणार आहेत. त्या दिवशी खुर्शीद यांनी रामबाग पॅलेस या स्थानिक हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी भोजन समारंभ आयोजित केला आहे. भोजनानंतर अश्रफ अजमेरला रवाना होणार आहेत. अजमेर येथील प्रार्थना आणि संबंधित कार्यक्रमांनंतर अश्रफ सायंकाळी पुन्हा जयपूरला येतील आणि तिथून विशेष विमानाने इस्लामाबादला रवाना होतील. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली. इतकेच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान अश्रफ हे खासगी दौ-यावर येणार आहे तर परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी भोजनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना का देऊ केले आहे? असा प्रश्नही शहीद हेमराज यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

Leave a Comment