नवी दिल्ली दि.८ – जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असलेल्या कोल इंडियाने आता उर्जा क्षेत्रातही पाऊल रोवण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिशा राज्यात ९ हजार कोटी रूपयांचा उर्जा प्रकल्प कंपनी उभारण्याच्या तयारीत असून त्यातून १६०० मेगावॉट वीज निर्मिती होऊ शकणार आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन वीज निर्मिती सुरू होण्यास चार वर्षांचा अवधी लागेल असे सांगितले जात आहे.
कंपनीने उर्जा प्रकल्पासंबंधीचा प्रस्ताव सादर केला असून महानदी खोऱ्याच्या कोळसा क्षेत्रातच हा प्रकल्प उभारला जाणार आहे. ओडिशात रस्ते आणि रेल्वे वाहतूकीचे जाळे पुरेस विकसित झालेले नसल्याने अन्यत्र कोळसा वाहून नेण्यात अडचणी आहेत. म्हणून कोळसा खाणीजवळच हा प्रकल्प उभारला जात असल्याचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष एस. नरसिग राव यांनी सांगितले. ते म्हणाले की येथून वीज वहनासाठी तारा टाकल्या जाणार आहेत.
या प्रकल्पासंबंधीचा प्रस्ताव सादर केला गेला असला तरी त्याला पर्यावरण खात्याकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. ती परवानगी मिळाल्यानंतरच प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ८०० मेगावॉट वीजमिर्मिती करण्याचा संकल्प असून त्यासाठी ४२ महिने इतका काळ लागणार आहे. त्यानंतर दुसर्याि टप्प्यात ८०० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाणार आहे असेही सांगण्यात येत आहे.