विक्रम पंडित भारतात बँकींग परवान्यासाठी प्रयत्नशील

न्यूयॉर्क दि. ७- सिटी ग्रुपच्या चीफ पदावरून आक्टोबर २०१२ ला राजीनामा देऊन बाहेर पडलेले विक्रम पंडित भारतात बँकींग परवाना मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते आहे. पंडित प्रायव्हेट इक्विटी फंड गटाकडून समर्थन असलेल्या बँकेत गुंतवणूकीचा विचार करत आहेत. त्या संबंधांनी त्यांनी कांही खासगी संस्था आणि भारतीय सरकारी अधिकाऱ्याशी चर्चेच्या प्राथमिक फेर्याा केल्या असल्याचेही सांगण्यात येत आहे. पंडित सह अर्जदार म्हणून बँकेचा परवाना मागतील असेही समजते.

रिझर्व्ह बँकेने नवीन बँकींग परवान्यासाठीची मार्गदर्शक तत्वे नुकतीच जाहीर केली आहेत. नवीन परवान्यासाठी अर्जाची अंतिम मुदत १ जुलै ही आहे. विक्रम पंडित यांनी त्यांच्या माजी सहकाऱ्याशीही या संदंर्भात बोलणी केली असून सिटी ग्रुपमधील अनेक सहकारी त्यांना सहाय्य करण्यास उत्सुक आहेत असेही समजते.

अन्य सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंडित यांना नामवंत कार्पोरेट हाऊसने त्यांच्या बँकेचे प्रमुखपद देऊ केले आहे अथवा याच बँकेत गुंतवणुकीची ऑफर दिली आहे. आक्टोबरमध्ये सिटी ग्रुपचा राजीनामा दिल्यानंतर पंडित यांनी अजून कुठेच काम पत्करलेले नाही त्यामुळे ते स्वतःच बँक काढतील या अंदाजला पुष्टी मिळत आहे असे जाणकारांचे मत आहे.

Leave a Comment