राज ठाकरे यांच्या चौकशीचे न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली: मराठी माणसाचा कैवार घेत बिहारी आणि उत्तरप्रदेशी नागरिकांना लक्ष्य करून त्यांची घुसखोर अशी संभावना करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांना न्यायालयीन रोषाला सामोरे जावे लागत आहे. राज ठकरे यण्च्य विरोधात दाखल झालेल्या प्रथम माहिती अहवालाची त्वरित चौकशी करण्याचे आदेश दिल्लीच्या न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

सतत मराठीचा मुद्दा आणि परप्रातियांविरोधात भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. मनसे एकीकडे परप्रातीयांना घुसखोर समजून हुसकावत असताना पक्षाध्यक्षांनी मात्र काही दिवसापूर्वी गुजरात आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे गुणगान गाईले. बिहारींना घुसखोर संबोधल्यामुळे आता राज यांच्याबाबत न्यायालयानेही कडक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआरची तातडीने चौकशी करा, असे निर्देश दिल्ली सत्र न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. मुंबईतील बिहारी नागरिकांना घुसखोर ठरवल्याबद्दल राज ठाकरे यांच्या विरोधात हा एफआयआर दाखल झाला आहे.

तपास अधिकार्‍यांनी न्यायालयासमोर या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या चौकशीचा सद्यस्थिती अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने हे निर्देश दिले. राज ठाकरे यांनी बिहारींना घुसखोर संबोधलेल्या वृत्ताची प्रत मिळावी यासाठी विविध वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना नोटीस पाठवल्याचे दिल्ली पोलिसांनी यावेळी न्यायालयाला सांगितले.

या भाषणाचे वार्तांकन करणारे पत्रकार, कॅमेरामन यांचीही पोलिसांनी माहिती मागितली आहे. प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात देशातील विविध न्यायालयात खटले दाखल आहेत. यात दोन समाजात जातीय तेढ निर्माण केल्याचा त्यांच्यावर मुख्य आरोप आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे

Leave a Comment