दिल्लीत महिला असुरक्षितच

भारताची संस्कृती फार मोठी आहे पण या देशाच्या राजधानीत एवढे प्रकार घडून आणि एवढा कोलाहल होऊनही महिला असुरक्षितच आहेत. भारताची राजधानी आणि दक्षिणेतल्या हैदराबाद शहरात महिला म्हणून घराच्या बाहेर पडणे जोखमीचे आहे. या संदर्भात करण्यात आलेल्या पाहणीत देशातली काही राज्ये श्रीमंत आहेत पण तीच राज्ये  महिलांसाठी सुरक्षित नाहीत असे दिसून आले आहे. देशातल्या जनतेला आपले जीवन कसे वाटते, त्याला आपला देश सुरक्षित वाटतो का, त्याचे जीवन संपन्न आहे का याच्या अनुरोधाने टाटा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ग्रुप या संस्थेने पाहणी केली. या पाहणीचे निष्कर्ष त्यांनी सर्व सामान्य माणूस सुखी आहे का आणि महिला सुरक्षित आहेत या दोन अंगांनी जाहीर झाले आहेत.

त्यानुसार पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश या चार राज्यातली जनता आपले जीवन सुखी समजते. या राज्यांत रोजगार निर्मिती चांगली आहे. त्यामुळे भौतिक जीवन सुखी आहे. पण महिलांच्या बाबतीत ही राज्ये फार धोक्याची आहेत. या बाबत दक्षिणेतली राज्ये म्हणजे कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू आणि केरळ ही चार राज्ये आघाडीवर आहेत. महिलांना सुरक्षित जीवन प्रदान करण्याबाबत ही राज्ये आघाडीवर आहेत.

महिलांच्या सुरक्षिततेबाबत गुजरात सर्वात आघाडीवर आहे असे या पाहणीत दिसून आले आहे. ईशान्य भारतातली   आदिवासीबहुल राज्ये पैशाने श्रीमंत नसतील पण त्या राज्यातले अशिक्षित आदिवासी लोक महिलांचा सन्मान करतात आणि त्या राज्यांत महिला आपल्याला सर्वात सुरक्षित समजतात. सर्वसामान्यपणे सुखी असलेल्या राज्यांत आंध्र प्रदेश, तामिळनाडू याही राज्यांचा समावेश आहे.  छत्तीसगड, आसाम, झारखंड आणि बिहार या राज्यांत मात्र नागरिक फार सुखी नाहीत. हे सुख खरे तर प्रगतीत आणि विकासात असते. या राज्यांनी विकास कामे फारशी वेगाने केलेली नाहीत, तिथे आदिवासी लोक जास्त राहतात याचा तिथल्या कल्याणकारी स्वरूपावर परिणाम झाला आहे.

दक्षिणेतले हैदराबाद शहर आणि उत्तरेतले देशाच्या राजधानीचे दिल्ली शहर महिलांसाठी सुरक्षित नाही. तिथे एकट्या दुकट्या बाईला रात्री फिरणे शक्य होत नाही. गुजरात मात्र महिलांच्या सुरक्षितते बाबत सर्वात अव्वल आहे. बंगलोर आणि चेन्नई ही दोन शहरे देशातल्या सर्व मोठ्या शहरांत महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित मानली जातात. तिथे महिला बिनधोकपणे रात्रीही एकट्या फिरू शकतात.

टाटांच्या या संस्थेने ही पाहणी काही स्वतः आणि स्वतंत्रपणे केलेली नाही. सरकारच्या अनेक पाहण्याचे अहवाल या संस्थेने मिळवले. त्यातल्या काही आकड्यांचा तपशीलात अभ्यास केला. त्यात शेती, उद्योग, रोजगार निर्मिती, शाळा, कुटुंब कल्याण, गुन्हे, अत्याचार इत्यादींच्या संदर्भात सरकार नेहमीच काही ना काही पाहणी करीत असते आणि  सरकारचे अशा पाहणीचे निष्कर्ष कधी दरसाल तर कधी दोन वर्षना प्रसिद्ध होत असतात. अशा अहवालांचे टाटांच्या या संस्थेने आपल्या परीने अध्ययन केले आहे. या अध्ययनातून ग्रामीण आणि शहरी भागातल्या जनतेच्या राहणीमानात काय आणि किती बदल होत आहेत याचा अंदाज येतो. त्यावरून समाजासाठी काही तरी करण्याचा प्रयत्न करणार्यान स्वयंसेवी संस्थांना आपल्या कामाची दिशा आणि धोरण ठरवता येते.  

यातले बरेचसे अहवाल सरकारीच आहेत पण सरकारलाही हा तुलनात्मक अभ्यास धोरणे नक्की करताना उपयोगी पडतो. या तुलनात्मक अभ्यासातून या संस्थेने देशातले २० सर्वात चांगले जिल्हे निवडून काढले असून सर्वात वाईट जिल्हेही शोधून काढले आहेत. मुंबई, चेन्नई, कोलकत्ता आणि हरिद्वार हे मोठ्या शहरांचे जिल्हे उत्तम ठरले आहेतच पण या २० जिल्हयात माहे आणि तिरूवल्लरु असे कोणाला फार माहीत नसलेल्या जिल्हयांचाही समावेश झाला आहे. याच सोबत काही वाईट जिल्हयांची निवड करण्यात आली आहे.         

या पाहणीचा संक्षिप्त अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात महाराष्ट्राचा खालच्या आणि वरच्याही राज्यांत समावेश झालेला नाही. याचा अर्थ असा होतो की महिलांची सुरक्षितता आणि सर्वसाधारण जन कल्याणाच्या बाबतीत मुद्दाम नमूद करावे असे वाईट किवा चांगले असे महाराष्ट्रात काहीच नसेल. नमूद करण्यासारखे वाईट असे काही नाही हे समाधान कारक आहे पण नमूद करण्यासारखे चांगलेही काही नाही ही बाब काही फार कौतुकाची नाही. या संस्थेने घर, स्वयंपाकघर, आरोग्य, करमणूक, फोन, वाहतूक, शिक्षण आणि वैद्यकीय सेवा यांचा विचार केला.  पण अशा पाहणीतून नेमके हाती काय सापडते ? माणूस सुखी आहे का याचा काही शोध लागतो का हा विचारण्यासारखा प्रश्न आहे.

वरील आठ सोयी चांगल्या असल्या म्हणजे माणूस सुखी असतो असे आपण मानतो. पण काही वेळा असे दिसते की, सगळ्या छान सोयी असूनही माणूस सुखी असतोच असे नाही. उलट या सगळ्या सोयींनी संपन्न असलेल्या राज्यांत  महिला सुरक्षित नाहीत. उलट काही वेळा असे दिसते की, अनेक गोष्टींचा अभाव असतानाही लोक सुखी असतात.  राजाला आपल्या महाली जी सुखे मिळत नाहीत ती एखाद्या  झोपडीत मिळू शकतात. ही बाब लक्षात ठेवूनच हा अहवाल वाचलेला बरा.

Leave a Comment