जुंदालच्या डोक्यावर सवार कसाबचे भूत

मुंबई: मुंबईलाच नव्हे; तर देशाला वेठीस धरणार्‍या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील ‘मास्टर माईंड’ अबू जुंदाल याच्या डोक्यावर याच हल्ल्यातील फाशी चढविलेला आरोपी अजमल कसाब याचे भूत सवार झाले आहे. रोज रात्री कसाब आपल्या स्वप्नात येतो. त्यामुळे आपली झोप उडाली आहे; असे जुंदाल याने वकिलांमार्फत संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा विशेष न्यायालयात केलेल्या अर्जात नमूद करण्यात आले. जुंदालची वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल १५ दिवसात सदर करण्याचे आदेश न्यायालयाने आर्थर रोड कारागृह प्रशासनाला दिले आहेत.

क्रूरकर्मा कसाबला ज्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते; त्याच ठिकाणी सध्या जुंदाल याला ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी सौदी अरेबियाच्या पोलिसांनी अटक केल्यापासूनच जुंदालची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. तिहार कारागृहातही त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याला पाठदुखीचाही त्रास आहे; असे जुंदालचे वकील एजाज नकवी यांनी सांगितले. आपल्याला अंडा सेलमधून इतरत्र हलवावे; अशीही जुंदाल याची मागणी आहे.

जुंदाल याची तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्या विनंतीवर विचार करण्यात येणार आहे.

Leave a Comment