नवी दिल्ली: महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न होत असल्याचा दावा केला जात असला तरीही सैतानांचा नंगानाच सुखेनैव सुरूच आहे. राजधानी दिल्लीचे उपनगर असलेल्या गाझियाबाद परिसरात शनिवारी एका विद्यार्थिनीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला.
पीडीत युवती शनिवारी गाझियाबाद येथील एका मॉलमध्ये खरेदी करून पूर्व दिल्ली विभागातील आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. त्यासाठी तिने शेअर रिक्षा पकडली. या रिक्षेत आधीच तिघे जण बसलेले होते. गाझियाबाद ते दिल्ली दरम्यानच्या प्रवासात महामार्गावरील निर्जन परिसरात रिक्षा थांबवून या तिघांनी या युवतीवर निर्घृण बलात्कार केला. तिच्या पर्समधील सर्व रोख रक्कम, मौल्यवान वस्तू आणि सेलफ़ोन काढून घेतला आणि तिला महामार्गाजवळ जखमी अवस्थेत फेकून दिले.
पीडीत तरुणी जखमी अवस्थेत आक्रोश करीत असूनही महामार्गावरून येणार्या- जाणार्यांपैकी कोणीही तिच्याकडे लक्ष देत नव्हते. अशा असहाय्य अवस्थेत ती सुमारे अडीच तास रस्त्याजवळ पडून होती. अखेर एका प्रवाशाने तिची अवस्था पाहून तिला गाडीत घेतले आणि थेट पोलीस ठाणे गाठले. तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करून तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी उघड झाली.
डिसेंबर महिन्यात दिल्लीत धावत्या बसमध्ये युवतीवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. अवघी तरुणाई रस्त्यावर उतरली. सरकारने महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे केले. दिल्ली पोलिसांनी गस्त आणि सुरक्षाव्यवस्था कडक केल्याची ग्वाही दिली. मात्र वासनांध नराधमांवर या सगळ्याचा काहीच परिणाम झालेला नसून महिलांवरील अत्याचाराला अधिकंच ऊत आला आहे.