हैदराबाद- चेन्नई व हैदराबाद कसोटी टीम इंडियाकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ कसोटी मालिकेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी आगामी काळात कसोटी संघात बदल केले जाण्याची शक्यता आहे. कसोटी मालिकेत ०-२ अशा पिछाडीवर असलेला ऑस्ट्रेलियन संघ पुढील दोन सामने जिंकून बरोबरी साधण्याचा विचार करीत आहे. फलंदाज उस्मान ख्वाजा व अष्टपैलू खेळाडू स्टीवन स्मिथ यांच्या नावाचा मोहालीत होणार्या तिसर्या कसोटीसाठीच्या संघात समावेश करण्यासाठी विचार करीत आहे.
ख्वाजा,स्मिथला संधी मिळणार
फलंदाज उस्मान ख्वाजा व अष्टपैलू खेळाडू स्टीवन स्मिथ यांचा तिसर्या कसोटीसाठीच्या संघात समावेश करण्यासाठी विचार केला जाईल, याला ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी दुजोरा दिला आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दणदणीत पराभूत केल्यामुळे सध्या चिंतेचे वातावरण आहे.
दोन्ही सामन्यात एड कॉवन, फिलीप ह्युजेस, शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर यांच्या बॅटमधून धावा निघत नसल्या तरी आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी हेच सर्वोत्तम युवा फलंदाज आहेत. त्यांच्याकडून कामगिरी करवून घेणे गरजेचे आहे. मायकेल क्लार्क पुढील कसोटीत तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो, असे ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी स्पष्ट केले.