केरळात तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण व बलात्कार

केरळ: जागतिक महिला दिनाच्या आधल्या दिवशी केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यात एका तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले व तिच्यावर बलात्कार करून तिला अत्यवस्थ अवस्थेत रस्त्याच्या कडेला टाकण्यात आले. या अमानुष घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या मुलीवर दोन शस्त्रक्रिया झाल्या असून तिवी प्रकृती आता स्थिर असल्याचे तिच्यावर उपचार करणार्‍या कोझिकोडे येथील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.

पीडीत मुलीचे कुटुंब तामिळनाडूतून येऊन तिरुर येथील पदपथावर वास्तव्यास होते. सोमवारी रात्री ती आईसोबत झोपली असताना तिचे अपहरण केले गेले. सकाळी जाग येताच आईने सर्वत्र मुलीची शोधाशोध केली मात्र ती सापडली नाही. मंगळवारी ती मुलगी एका सरकारी शाळेजवळ अत्यवस्थ अवस्थेत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी पाहिले.

त्यावेळी ती मुलगी तापाने फणफणंत होती आणि तिच्या शरीराला मुंग्या लागल्या होत्या. पोलिसांनी तिला तिरुर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची परिस्थिती अत्यंत नाजूक झाल्या कारणाने तेथील डॉक्टरांनी तिला कोझिकोडे येथील रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी बारा जणांची चौकशी केली. त्यापैकी एका २५ वर्षीय युवकाने हे अघोरी कृत्य केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला. हा युवक वेरोजगार आणि नैराश्यग्रस्त असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

एका बाजूला सरकार महिला अत्याचाराविरोधात सक्षम कायदा काणण्याची चर्चा करीत असताना देशात दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढच होत आहे. देशाच्या राजधानीत गेल्या तीन दिवसांत सहा बलात्काराच्या घटना झाल्या; तर सोमवारी नागपूर येथे एका बारा वर्षीय शालेय मुलीवर तिच्या शाळेत बलात्कार करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली. जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ही अत्यंत दुर्दैवी घटना मानली जात आहे.

Leave a Comment