
नवी दिल्ली: बहुचर्चित हेलिकॉप्टर घोटाळयाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) एरोमॅट्रिक्स या कंपनीचे माजी संचालक गौतम खेतान यांची आज चौकशी करण्यात आली.
नवी दिल्ली: बहुचर्चित हेलिकॉप्टर घोटाळयाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) एरोमॅट्रिक्स या कंपनीचे माजी संचालक गौतम खेतान यांची आज चौकशी करण्यात आली.
अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी घ्यायच्या हेलिकॉप्टर्स व्यवहारात ३ हजार ६०० कोटी रुपयांची लाच दिल्यासंदर्भात ही चौकशी करण्यात आली. खेतान यांचे आज सकाळी दहाच्या सुमारास सीबीआय मुख्यालयात आगमन झाले. तिथे त्यांची ही चौकशी करण्यात आली; अशी माहिती तपास संस्थेच्या सूत्रांनी दिली.
इटलीतील सरकारी वकिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात खेतान यांचा संदर्भ दिला होता. तथापि; त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सीबीआयने यापूर्वीच एरोमॅट्रिक्स आणि आयडीएस इन्फोटेक या कंपन्यांच्या अधिकार्यांची याप्रकरणी चौकशी केली आहे. या कंपन्यांच्यामार्फत अभियांत्रिकी करारासाठीच्या पैशाच्या स्वरूपात मॉरिशस आणि टयूनिशिया या देशांतून लाच दिल्याचा आरोप आहे.
माजी हवाईदल प्रमुख एस.पी. त्यागी यांच्यासह इतर ११ जणांविरूद्ध सीबीआयने प्राथमिक तपास अहवाल (पीई) दाखल केला आहे. या पीईमध्ये एरोमॅट्रिक्स आणि आयडीएस इन्फोटेकसह चार कंपन्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे.