मालदीवचे माजी अध्यक्ष नाशीद अटकेत

माले: मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नाशीद यांना अखेर अटक करण्यात आली. आपल्या कार्यकाळात एका न्यायाधीशाला अटक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटवर पोलिसांनी ही कारवाई केली. नाशीद यांनी अटक टाळण्यासाठी सुमारे ११ दिवस येथील भारतीय दूतावासात आश्रय घेतला होता.

नाशीद यांना अटक करण्यात आली आहे. हुलहुमाले न्यायालयाने नाशीद यांना आपल्यासमोर हजर करण्याचा आदेश पोलिसांना दिल्यावर त्यांना अटक करण्यात आली; अशी माहिती अध्यक्ष मोहम्मद वाहिद यांचे प्रसिद्धी सचिव मसूद इमाद यांनी दिली.

दरम्यान, नाशीद यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या अटकसत्रावेळी नाशीद यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये चकमकही झडली. मुख्य गुन्हे न्यायाधीश अब्दुल्ला मोहम्मद यांना अध्यक्ष असताना केलेली अटक नाशीद यांना भोवली आहे.

आपल्याविरुद्ध अध्यक्षीय निवडणुकीत भाग घेता येऊ नये म्हणून राजकीय हेतूने अटकेची कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप करून ती टाळण्यासाठी त्यांनी भारतीय दूतावासात आश्रय घेतला होता. मात्र वाहिद यांनी नाशीद अध्यक्षीय निवडणूक लढविण्यासाठी स्वतंत्र असल्याची ग्वाही दिल्यावर २३ फेब्रुवारीला त्यांना भारतीय दूतावास सोडणे भाग पडले होते.