धुमसते शेजारी

भारताचा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत कायमचा सदस्य म्हणून समावेश व्हावा की नाही हा गेल्या दहा वर्षांपासूनचा चर्चेचा विषय झाला आहे. तिथे जाऊन भारताला जगाचे राजकारण करायचे आहे पण तूर्तास भारत सरकारला आपल्या शेजारी देशांशी नेमका कसा व्यवहार करावा असा प्रश्न पडला आहे. भारताच्या शेजारचे बहुतेक दक्षिण आशियाई देश सार्क संघटनेचे सदस्य आहेत. या आठ देशांच्या संघटनेत  भारत हा सर्वात मोठा देश आहे पण या देशांवर भारताचे वर्चस्व नाही आणि या प्रदेशातल्या घडमोडींवर भारताचे नियंत्रणही नाही. भारताच्या डाव्या आणि उजव्या बाजूंना असलेल्या बांगला देश आणि पाकिस्तान या दोन देशात तर यादवी सदृश्य स्थिती आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे अखंड बंगालमधील आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी  बांगला देशात गेले पण तिथे त्यांच्या आगमनाच्या आधीच हिंसाचार सुरू झाला होता आणि त्यांच्या ढाक्क्यातल्या मुक्कामातच त्यांच्या निवासाच्या ठिकाणी बाँबस्फोट झाला. जमाते इस्लामी या मूलतत्ववादी संघटनेने हिंसक आंदोलन उभे केले आहे. आता तिथे १९७१ च्या बंडाच्या काळातल्या मानवी हक्काच्या भंगाबद्दलचे खटले उभे राहिले आहेत. जमाते इस्लामी या संघटनेचे नेते दिलवर हुसेन सैदी यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. 

पाकिस्तान हा १९७१ पूर्वी जगातला सर्वात विचित्र देश होता. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे या देशाचे दोन भाग होते आणि या दोन भागामध्ये भारत देश पसरलेला होता. तरी सुद्धा धर्माच्या बंधनाने पूर्व भाग पश्चिम भागाशी जोडलेला राहील अशी पश्चिम पाकिस्तानातल्या नेत्यांची कल्पना होती. दोन्ही भागांचा धर्म एक असला तरी भाषा आणि संस्कृती वेगळी होती. या वेगळेपणातून बंड झाले आणि पाकिस्तानची फाळणी होऊन पूर्व पाकिस्तानचा बांगला देश झाला. याच देशात काही लोकांचा या स्वातंत्र्य लढ्याला विरोध होता. पाकिस्तानच्या सैन्यानेही बांगला देशातले बंड मोडून काढण्यासाठी लोकांवर अनन्वित अत्याचार केले. जमाते इस्लामीने सैन्याच्या बरोबरीन बांगलादेशी बांधवांवर अत्याचार केले. या अत्याचारी कार्यकर्त्यांना आता  कडक शिक्षा सुनावल्या जात आहेत.

१९७१ च्या बंडाशी संबंधित खटल्यांमुळे बांगला देशात यादवी निर्माण झाली आहे. पाकिस्तानातही बंडाळी आहे. या देशात मुस्लिम  अतिरेकी, धर्मवेड्या संघटना हिंदू, खिश्चन आणि अहमदिया या अल्पसंख्य गटांवर हल्ले करून त्यांना जगणे मुश्कील करीत आहेतच पण मुस्लिम समाजातल्याच अल्पसंख्य शिया पंथीयांवर हिंसक हल्ले करीत आहेत. शिया आणि सुन्नी मुस्लिमांच्या आपापसातल्या हिंसक संघर्षामुळे बलुचिस्तानात अराजक निर्माण झालेले आहे. या अराजकातून तिथे काय घडेल याचा काही भरवसा नाही. परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे.

दोन दिवसांपूर्वी कराची शहरात बाँबस्फोट होऊन ४५ जण ठार झाले. त्यामुळे तिथल्या शिया पंथियांनी संप पुकारला आहे. कराची हे पाकिस्तानातले मुंबई म्हणवली जाते. तिथले सारे व्यापार व्यवहार बंद पडले आहेत. गेल्या जानेवारीत क्वेट्टा शहरात शिया पंथियांच्या मशिदीवर हल्ला होऊन १०० लोक मारले गेले होते. पाकिस्तानात या दोन पंथांत सुरू असलेल्या संघर्षात ५०० पेक्षाही अधिक लोक मारले गेले आहेत. अनेक शिया पंथीयांनी देशा सोडून अन्य देशांत आश्रय घेतला आहे. पाकिस्तानात कोणत्याही अल्पसंख्यकांना संरक्षण नाही.

सार्क संघटनेत नव्याने सामील झालेला अफगाणिस्तान हा देशही अशांत आहे. अफगाणिस्तानातल्या हिंसाचारात शेकडो लोक ठार झाले असून तिथले सारे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जगात अनेक देश दहशतवादाने त्रस्त झाले पण त्या सगळ्या देशातल्या दहशतवादाचे स्वरूप आणि अफगाणिस्तानातल्या दहशतवादाचे स्वरूप वेगवेगळे आहे.  अन्य देशांत दहशतवादी कारवाया चालल्या आणि काही काळाने बंदही झाल्या पण अफगाणिस्तानात १९९१ पासून सलगपणे दहशतवादी कारवाया जारी आहेत. अमेरिकेने तिथे हस्तक्षेप केला त्यामुळे जनतेने निवडलेले सरकार सत्तेवर येऊन तालिबान संघटनांचा हिंसाचार कमी झाला पण गेल्या दोन वर्षपासून अमेरिकेच्या सैन्याच्या वापसीची चर्चा सुरू आहे. कारण अमेरिकेलाही जगभरात करावयाची असली दादागिरी परवडेनाशी झाली आहे.

अमेरिका तिथून कधी ना कधी परत जाणार आहे. अमेरिकेच्या अनुपस्थितीत तिथली स्थिती फारच भयानक होणार आहे. भारताने आपले वजन अफगाणिस्तानात खर्ची घालावे आणि तिथल्या घडामोडींवर नियंत्रण ठेवावे अशी अमेरिकेची कल्पना आहे पण अमेरिकेचे हे बाळ दत्तक घेण्यास भारत सरकार तयारही नाही आणि सक्षमही नाही. नेपाळ, श्रीलंका याही देशांत फार शांतता आहे असे नाही. भारत ही जगातली महाशक्ती होणार असे म्हटले जाते खरे पण तसे झाले तरीही ती जगातली लष्करी महाशक्ती होण्याची शक्यता कमीच आहे. त्यासाठी आवश्यक असलेला आक्रमकपणा आपल्या नेतृत्वात कमीच आहे. त्यामुळे दक्षिण आशियातल्या या सार्याअ घडामोडींवर  भारतापेक्षा चीनचा प्रभाव अधिक आहे. विशेषतः पाकिस्तान हा देश वरचेवर अमेरिकेच्या वर्चस्वाखालून मोकळा होत असताना चीनच्या आहारी चालला आहे. 

Leave a Comment