झुंजार ह्युगो चावेझ अखेर काळाच्या पडद्याआड

व्हेनेझुएला दि. ६ – गेली दोन वर्षे कॅन्सरची झुंज देत असलेले दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या छोट्या देशाचे अध्यक्ष ह्युगो चावेझ यांचे मंगळवारी रात्री उशीरा रूग्णालयात निधन झाले. ते ५८ वर्षोंचे होते. व्हेनेझुएलामध्ये बलाढ्य अमेरिकेच्या विरोधात जाऊन समाजवादी राजवट आणण्याचे श्रेय ह्यूगो यांच्याकडे जाते. गरिबांचा वाली आणि सर्वसामान्यांचा नेता अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्या निधनाने देश शोकसागरात बुडून गेला आहे.

उपाध्यक्ष निकोलस मदुरो यांनी ह्युगो यांच्यावर अमेरिकेने केलेल्या विषप्रयोगामुळेच त्यांना कर्करोग झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असा आरोप केला आहे. देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून व्हेनेझुएलाच्या घटनेप्रमाणे अध्यक्षांच्या मृत्यूनंतर तीस दिवसांत तेथे निवडणका घेतल्या जातील. मदुरो यांनाच ह्युगो यांचे उत्तराधिकारी मानले जाते त्यामुळे मदुरोच व्हेनेझुएलाचे पुढचे अध्यक्ष असतील असे सांगितले जात आहे.

ह्युगो यांचा जन्म सामान्य कामगार कुटुंबात झाला होता. मात्र सुरवातीपासूनच त्यांना देशातील राजकीय पद्धतीबाबत असमाधान होते. त्यातूनल लष्करी अधिकारी बनलेल्या ह्युगो यांनी रिव्होल्यूशनरी बोलिव्हीयन मुव्हमेंट सुरू केली. त्यांच्या पक्षाने निवडणूका लढविल्या मात्र त्यात अपयश आले. तेव्हा अध्यक्ष कार्लोस पेरेझ यांनी त्यांना दोन वर्षे तुरूंगवासात टाकले होते. हे साल होते १९९२. त्यानंतर मात्र १९९८ साली ह्युगो यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला आणि ते अध्यक्ष बनले. त्यानंतर त्यांनी देशाची घटना बदलून ती सर्वसामान्यांसाठी लाभाची कशी असेल यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यामुळे त्यांना देशात अमाप लोकप्रियता मिळाली.

Leave a Comment