आयएमई मोशन पिक्चर्सचा ‘तुझ्या धर्म कोंचा ?’

मराठीत आज दर्जेदार चित्रपट निर्मितीसाठी अनेक संस्था तयार झाल्या आहेत. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल अशी चित्रपट निर्मिती संस्था म्हणजे आयएमई मोशन पिक्चर्स ही संस्था. या संस्थेतर्फ़े आतापर्यंत अनेक गाजलेले आणि वेगळ्या पठडीतले सिनेमे तयार केले गेले. सोबतच उत्तम मालिका सुद्धा तयार केल्या गेल्या. नुकताच त्यांचा ‘पुणे ५२’ सिनेमा येऊन गेला. या सिनेमानंतर आयएमई मोशन पिक्चर्स आणखी एक वेगळ्या विषयाचा सिनेमा घेऊन येत आहेत. तो म्हणजे ‘तुह्या धर्म कोंचा?’.

खरंतर नावातच या सिनेमाचं वेगळेपण दिसून येतं. हा सिनेमा येत्या १५ मार्च रोजी चित्रपटगॄहात प्रदर्शीत होत आहे. आयएमई मोशन पिक्चर्स यांनी स्प्रिंट आर्ट क्रिएशन प्रा.लि. यांच्या सहकार्याने हा सिनेमा तयार केला असून अभय गाडगीळ, श्रीरंग गोडबोले, मोहन दामले यांनी त्याची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शन आणि लेखनाची धुरा सतीश मनवर यांनी सांभाळली आहे.

सामजिक विषयाच्या या सिनेमात उपेंद्र लिमये, विभावरी देशपांडे, सुहास पळशीकर, किशोर कदम, शशांक शेंडे यांच्या मुख्य भूमिका असून दत्तप्रसाद रानडे यांनी संगीत दिले आहे तर दासू आणि सखाराम पाटील यांनी गीते लिहिली आहेत. छायाचित्रण परिक्षीत वॉरियर यांचे तर संकलन सुचित्रा साठे यांचे आहे. पार्श्वसंगीत ऑगस्टीन सॅम्युयल यांचे आहे. १५ मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शीत होणार असून या सिनेमाबद्दल आधीच बरीच उत्सुकता वाढलेली आहे.