राहुल गांधी यांचा युवक व मध्यममर्गीय नेतृत्वावर भर

नवी दिल्ली: काँग्रेसने उपाध्यक्षपद देऊन राहुल गांधी यांची पंतप्रधानपदासाठीची उमेदवारी बळकट केली गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असताना स्वत: राहुल यांनी मात्र पंतप्रधान होणार का, हा प्रश्‍न आपल्याला विचारणे चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण दिले.

पक्षाच्या खासदारांशी चर्चा करताना राहुल म्हणाले की, आपण ‘लंबी रेस का घोडा’ होण्यासाठी तयारी करत आहोत. त्यामुळे पक्षाला आपले प्राधान्य आहे. काँग्रेस असो वा भाजप सर्वच पक्षांत सत्ता नसल्यावर सारखीच भावना असते. मात्र आपल्याला संसदेत 720 खासदारांचे सशक्तीकरण करायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. आपली आजी इंदिरा गांधी यांच्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आपल्याला मात्र हायकमांड संस्कृती मान्य नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

भारतात बसपसारखा एका नेतृत्वाखालील तसेच समाजवादीसारखा दोन नेत्यांकडून व भाजपसारखे पाच ते सहा नेत्यांकडून चालणारे पक्ष आहेत. मात्र आपल्याला मध्यमवर्गातील नेत्यांना पुढे आणायचे आहे. विविध राज्यातील अशा सुमारे पाच हजार नेत्यांना मजबूत करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे आपले आदर्श असून काँग्रेसमध्ये वरपासून खालच्या स्तरांपर्यंत आमूलाग्र बदल करण्याची आपली इच्छा असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. गांधींजींचा ‘माझे गुरू’ असा उल्लेख करत आपण सत्तेमागे धावणार्‍यांपैकी नसल्याचेही ते म्हणाले.

देशातील सर्वच पक्षांमध्ये असलेल्या विशिष्ट बांधणीमुळे युवकांना राजकारणात मोठी भरारी मारण्यासाठी महत्त्वाची पदे मिळू शकत नाहीत, असे सांगत हे चित्र बदलले नाही तर युवावर्गाच्या संयमाचा स्फोट होण्याचा इशाराही गांधी यांनी दिला. जर मी विवाह केला तर मलापण माझ्या मुलांनी माझी जागा घ्यावी असेल वाटेल. त्यामुळे नजीकच्या काळात लग्नाचे नियोजन नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘व्हार्टन इंडिया इकॉनॉमिक फोरम’मधील भाषण रद्द केल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या फोरममध्ये भाषण करण्यास नकार दिला आहे. मोदी यांचे भाषण रद्द केल्यावर शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू आणि अदानी समूहानेही यातून आपले अंग काढून घेतले होते. मोदींचे भाषण रद्द केल्यानंतर राहुल गांधींना त्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र गांधी यांनीही आपला नकार कळविला आहे. तथापि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मात्र या परिषदेत भाषण करण्याचे आमंत्रण स्वीकारले आहे.

Leave a Comment