लंडन दि.६ – तरूण वयात कुटुंबियांकडून विवाहासाठी जबरदस्ती केली जात असेल तर अशा तरूण वर्गाच्या मदतीसाठी ब्रिटन सरकारच्या अनुदानातून स्मार्टफोन अॅप तयार केले गेले असून त्याचे नामकरण फ्रिडम अॅप असे करण्यात आले आहे. हे अॅप तयार करताना ब्रिटनच्या प्रसिद्ध स्कॉटलंड यार्ड विभागाकडन मिळालेली माहिती ग्राहय धरण्यात आली आहे असे समजते. त्यामुळे अशा प्रकारे विवाहास सामोरे जाणारे युवक या अॅपचा वापर करून मदत मिळवू शकणार आहेत.
या विभागाच्या फोर्सड मॅरेज युनिटने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ब्रिटनमध्ये दरवर्षी १६ ते २५ या वयोगटातील पाच ते आठ हजार मुलामुलींची लग्ने जबरदस्तीने केली जातात. यात पाकिस्तानी मूळ असलेल्यांची टक्केवारी ४७.१, बांग्लादेशाचे मूळ असलेल्यांची टक्केवारी ११ टक्के तर भारतीय मूळ असलेल्यांची टक्केवारी ८ टक्के आहे. बरेचवेळा या वयोगटातील मुलामुलींना शिक्षण पूर्ण करणयाची इच्छा असते अथवा इतक्या लवकर लग्न करायचे नसते. मात्र लग्नासाठी त्यांच्यावर जबरदस्ती केली जाते व त्यातून कौटुंबिक हिंसाचारासारख्या घटना घडतात असे या अॅपच्या संशोधक अनीता प्रेम यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की लहान वयात लग्न करू नये यासाठी जगभरच जागृती करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आम्ही येत्या कांही आठवड्यात भारताला भेट देणार आहोत. ब्रिटनमध्ये अॅरेंज मॅरेजला विरोध नाही मात्र त्यात जबरदस्ती असू नये असे सरकारचे म्हणणे आहे. आशियाई देशातील ब्रिटनमध्ये राहिलेली ही तरूण पिढी दोन वेगळ्या संस्कृतीत जगते आहे व त्यामुळेच अडचणी निर्माण होत आहेत.
आशियाई देशांप्रमाणेच तुर्की, ग्रीक, आफ्रिकन, अरब आणि सोव्हिएट रिपब्लीकनमधील कांही ब्रिटनवासी यांच्यातही लहान वयात आईवडील ठरवतील तेथे लग्न करण्याची प्रथा आहे. असे विवाह बेकायदा नसले तरी ब्रिटनच्या सिव्हील कोर्टना ते जबरदस्तीने किवा मनाविरूद्ध केले जात असतील तर ते थांबविण्याचे अधिकार आहेत असेही अनीता म्हणाल्या.